Food Lifestyle: बदलती खाद्यसंस्कृती एक गंभीर आरोग्य संकट, वाचा तज्ज्ञ काय सांगतात..
हृदय विकार हे भारतातील मृत्यूचे एक प्रमुख कारण बनले आहे
By : डॉ. सचिन पाटील
कोल्हापूर : आजच्या वेगवान जीवनशैलीत खाद्य संस्कृतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. पारंपरिक घरगुती जेवणाची जागा फास्ट फूड, प्रक्रिया केलेले (प्रोसेस्ड) अन्न आणि तयार खाद्यपदार्थांनी घेतली आहे. भारतात, विशेषत: शहरी भागात, खाण्याच्या सवयींमध्ये झालेल्या या बदलांचा थेट परिणाम आरोग्यावर, विशेषत: हृदयाच्या आरोग्यावर होत आहे.
हृदय विकार हे भारतातील मृत्यूचे एक प्रमुख कारण बनले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढण्यामागे बदलती खाद्य संस्कृती हे एक कारण आहे. प्रत्येकाने आपल्या खाण्याच्या सवयींवर पुनर्विचार करून निरोगी हृदयासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.
शेवटी, ‘निरोगी खा, निरोगी रहा’ ‘जसे खाणार तसे शरीर होणार’ हे मंत्र प्रत्येकाने अंगीकारले तरच आपल्याला हृदयविकार आणि कॅन्सर टाळता येणे शक्य आहे. हृदय विकार आणि खाद्यसंस्कृतीचा संबंध...
1. फास्ट फूड आणि प्रोसेस्ड फूडमध्ये ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात, जे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉ ल जमा करतात.
यामुळे धमनी अरुंद होऊन हृदयविकाराचा धोका वाढतो.
2. प्रोसेस्ड फूड आणि पॅकेज्ड स्नॅक्समधील जास्त सोडियममुळे रक्तदाब वाढतो. दीर्घकाळ उच्च रक्तदाब हृदयावर ताण टाकतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढवतो.
3. साखरेचं जास्त सेवन आणि प्रक्रिया केलेल्या कार्बोहायड्रेट्समुळे टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो.
4. जास्त कॅलरी आणि कमी पौष्टिक पदार्थांमुळे लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि उच्च कोलेस्टेरॉल यांचा एकत्रित परिणाम ‘मेटाबॉलिक सिंड्रोम‘ म्हणून ओळखला जातो, जो हृदयविकारांचा धोका दुप्पट करतो.
5. पारंपरिक आहारात फायबर (जसे की धान्ये, भाज्या, फळे) आणि अँटिऑक्सिडंट्स यांचे प्रमाण जास्त होते, जे हृदयाचे संरक्षण करतात. आधुनिक खाद्यसंस्कृतीत यांचा अभाव हृदयविकारांना आमंत्रण देतो.
उपाय
1. पारंपरिक आहाराचा स्वीकार : ताज्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, डाळी आणि कडधान्ये यांचा समावेश आहारात करा. मैदा आणि पॉलिश्ड तांदळाऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी धान्ये वापरा. घरगुती मसाल्यांचा वापर करा, जे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात.
2 फास्ट फूड आणि प्रोसेस्ड फूड कमी करा : ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स असलेले पदार्थ टाळा. पॅकेज्ड स्नॅक्सऐवजी नट्स, मखाने किंवा फळे खा. साखरेचे प्रमाण कमी करा आणि नैसर्गिक गोडवा (जसे की खजूर, मध) वापरा.
3 नियमित व्यायाम : दररोज किमान 30 मिनिटे मध्यम व्यायाम (जसे की चालणे, योग, सायकलिंग) करा. व्यायामामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते आणि रक्तदाब कमी होतो.
4 वजन नियंत्रण : लठ्ठपणा टाळण्यासाठी कॅलरीचे प्रमाण नियंत्रित करा. नियमित वजन तपासणी आणि ँश्घ् (बॉडी मास इंडेक्स) मॉनिटर करा.
5 नियमित तपासणी : रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची नियमित तपासणी करा. 30 वर्षांनंतर दरवर्षी हृदयाची तपासणी (ईसीजी आदी) करणे उपयुक्त ठरते.
फास्ट फूड आणि प्रोसेस्ड फूड :
पिझ्झा, बर्गर, शीतपेये, आणि पॅकेज्ड स्नॅक्स यांचा वापर वाढला आहे. हे पदार्थ ट्रान्स फॅट्स, सॅच्युरेटेड फॅट्स, साखर आणि सोडियमचे प्रमाण जास्त असतात, जे हृदयासाठी हानिकारक आहेत.
पारंपरिक जेवणाचा ऱ्हास
शहरीकरण आणि व्यस्त जीवनशैलीमुळे घरगुती जेवण बनवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. लोक ऑनलाईन फूड डिलिव्हरी आणि रेडी-टू-ईट पदार्थांवर अवलंबून आहेत. त्यामुळे फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे आहारातील प्रमाण कमी होत आहे.
साखर आणि प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट्स : मैदा, पॉलिश्ड तांदूळ आणि साखरेचा वापर वाढला आहे, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिन प्रतिरोध वाढतो.
तेल आणि चरबीयुक्त : भारतीय खाद्यसंस्कृतीत तळलेले पदार्थ (जसे की भजी, वडा, समोसे) आणि जास्त तेलात बनवलेले पदार्थ यांचा वापर वाढला आहे. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.
खाण्याच्या वेळा आणि पद्धतींमध्ये बदल : अनियमित खाण्याच्या वेळा, रात्री उशिरा जेवण आणि बिंज इटिंग (जास्त प्रमाणात खाणे) यामुळे चयापचय (मेटाबॉलिझम) बिघडते, ज्याचा हृदयावर परिणाम होतो.
बदलती खाद्यसंस्कृती काय बदललं?
भारतात पारंपरिक खाद्यसंस्कृती ही संतुलित आणि पौष्टिक मानली जाते. ताज्या भाज्या, धान्ये, डाळी, ताक, दही आणि घरगुती मसाले यांचा समावेश असलेले जेवण आरोग्यदायी होते. खाण्याचे प्रमाण कमी व संतुलित होते. व्यायामाचे वा कष्टाचे प्रमाण जास्त होते मात्र, गेल्या काही दशकांत खालील बदल खाद्यसंस्कृतीत दिसून येत आहेत.