अंतरिक्षात शिजवले अन्न
चीन हा देश सध्या विविध आणि अचाट प्रयोग करण्यात गुंतला असल्याचे दिसून येत आहे. भूमीवर तर त्या देशाचे संशोधन चाललेच आहे, खेरीज अंतराळातही तो विविध प्रयोग करीत आहे. हे प्रयोग भविष्यकाळात मानवाला अंतराळात वास्तव्य करण्यास उपयुक्त ठरतील, असे या देशाचे म्हणणे आहे. चीनने अंतराळात एक अंतराळ स्थानक प्रस्थापित केले असून या स्थानकावर काही दिवसांपूर्वी प्रथमच ओव्हनचा उपयोग करुन अन्न शिजविण्याचा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. ओव्हनचा उपयोग करुन चीनी अंतराळ संशोधकांनी आणि अंतराळ वीरांनी ‘मिरी स्टेक’ आणि ‘चिकन विंग्ज’ हे पदार्थ बनविले आहेत.
अंतराळात अंतराळवीरांना आणि संशोधकांना ताजे आणि उष्ण अन्न मिळत नाही. त्यांना बहुतेककाळ साठविलेल्या अन्नावर दिवस काढावे लागतात. त्यामुळे त्यांच्या शरीरप्रकृतीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. पण अंतराळ स्थानकात ओव्हनचा उपयोग करुन अन्न शिजवता येते, हे चीनने दाखवून दिले आहे. त्यामुळे भविष्यकाळात अंतराळ स्थानकात वास्तव्य करणाऱ्यांना ताजे आणि उष्ण अन्नही मिळू शकणार आहे. चीनच्या अंतराळ स्थानकातून आता काही अंतराळवीर पृथ्वीवर परतत आहेत. तर काही नवे अंतराळवीर स्थानकात गेले आहेत. नव्या अंतराळवीरांनी परतणाऱ्या अंतराळवीरांना निरोप देण्यासाठी हे खाद्यपदार्थ बनविले होते, अशी माहिती देण्यात आली आहे. अंतराळात उपयोगी पहणारा हा ओव्हनही विशेष प्रकारचा आहे. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्या असे, की तो धूरमुक्त किंवा स्मोकफ्री आहे. कारण अंतराळ स्थानकात धूर झाला तर तो तेथून बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे धूर करुन चालत नाही. म्हणून धूरमुक्त ओव्हनची निर्मिती करण्यात आली. या ओव्हनमध्ये जो धूर होतो, तो त्यातून बाहेर पडून अंतराळ स्थानकात पसरत नाही. तशी त्याची रचना केलेली असते.