For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फोंडा न्यायदंडाधिकारी, जिल्हा न्यायालयात न्यायाधीशांची पदे रिक्त

01:01 PM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
फोंडा न्यायदंडाधिकारी  जिल्हा न्यायालयात न्यायाधीशांची पदे रिक्त
Advertisement

हजारो खटले प्रलंबित : सहा महिन्यांपासून तारीख पे तारीख, तातडीचे खटले अन्य दोन न्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी

Advertisement

फोंडा : फोंडा तालुक्यातील न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालयाच्या ‘सी’ कोर्टमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून तर जिल्हा सत्र न्यायालयात पाच महिन्यांपासून न्यायधीश नसल्याने शेकडो खटले प्रलंबित आहेत. प्रथमवर्ग   न्यायालयात दिवाणी व फौजदारी खटले चालतात तर जिल्हा न्यायालयात अपिलसह गुन्हेगारी, भूसंपादन तसेच नुकसान भरपाईचे दावे व अन्य याचिकांवर न्यायदान केले जाते. दोन्ही न्यायालयात न्यायाधीशांची पदे रिक्त असल्याने सुनावणीसाठी येणाऱ्या खटल्यांना पुढीच्या तारखा देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

फोंडा प्रथमवर्ग न्यायालयात ए, बी आणि सी असे तीन कोर्ट भरत असून त्यापैकी सी कोर्टमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून न्यायाधीशाचे पद रिक्त आहे. या प्रथमवर्ग न्यायालयात प्रामुख्याने दिवाणी व फौजदारी खटले चालविले जातात. चेक बाऊंन्स म्हणजेच न वठलेल्या धनादेशांवर सुनावणीसाठी येणारे खटलेही बरेच असतात. अॅड. शैलेंद्र नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रथमवर्ग न्यायालयात दिवसाकाठी किमान चाळीस ते पन्नास व त्याहून अधिक खटले सुनावणीसाठी येतात. दि. 20 जून रोजी 64 तर दि. 21 जून रोजी 86 खटल्यांची यादी सुनावणीसाठी सूचना फलकावर लावण्यात आली होती. त्यापैकी बहुतेक खटल्यांना पुढील तारखा दिल्या जातात किंवा तातडीचे खटले अन्य दोन न्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी पाठविले जातात. गेल्या सहा महिन्यांचा हिशेब केल्यास हजारो खटले सुनावणीसाठी प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे विविध खटल्यातील पक्षकारांना तारखांवर तारखा मिळत आहेत. पाच वर्षे व त्यापेक्षा जास्त काळ चालणारे खटले सध्या बी कोर्टमध्ये वर्ग करण्यात आल्याची माहिती वकिलांकडून मिळाली आहेत.

Advertisement

फोंड्यातील न्यायालयात उत्तर जिल्हा आणि सत्र न्यालयाची एक शाखा असून या कोर्टमध्येही गेल्या पाच महिन्यांपासून न्यायाधीश उपलब्ध नाहीत. खालच्या न्यायालयातून अपिलसाठी येणारे खटले तसेच गुन्हेगारी व अन्य खटले या जिल्हा न्यायालयात सुनावणीसाठी येतात. वर्षभर न्यायाधीश नसल्याने तातडीचे व अन्य काही खटले पणजीच्या न्यायासनासमोर वर्ग केले जात आहेत. मात्र उर्वरीत बरेच खटले प्रलंबित राहत असल्याने पक्षकारांना तारखांवर तारखा मिळत आहेत, असे फोंडा वकील संघटनेचे सचिव अॅड. सुरेल तिळवे यांनी सांगितले.

दरम्यान पणजी येथील जिल्हा न्यायालयासाठी मेरशी येथे प्रशस्त असे संकुल उभारले जात असून फोंड्यातील जिल्हा व सत्र न्यायालयाची शाखा या नवीन जागेत स्तलांतरीत करण्याच्या हालचाली सुऊ आहेत. फोंडा तालुक्याचे एकंदरीत कार्यक्षेत्र व न्यायदानासाठी येणाऱ्या खटल्यांची संख्या लक्षात घेऊन जनतेच्या सोयीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयाची शाखा फोंड्यातच ठेवावी अशी मागणी फोंडा वकील संघटनेने केली आहे. वकील संघटनेच्या नुकत्याच झालेल्या विशेष आमसभेत तसा ठराव घेण्यात आला असून त्याची प्रत लवकरच उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय प्रशासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती अॅड. सुरेल तिळवे यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.