कर्नाटककडून केरळला फॉलोऑन
वृत्तसंस्था / थिरुअनंतपुरम
2025 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या सामन्यात खेळाच्या तिसऱ्या दिवशी कर्नाटकाकडून केरळला फॉलोऑन स्वीकारावा लागला. या सामन्यात कर्नाटकाने आपला पहिला डाव 5 बाद 586 धावांवर घोषित केल्यानंतर कर्नाटकाने केरळला पहिल्या डावात 238 धावांत गुंडाळले. दिवसअखेर केरळने दुसऱ्या डावात बिनबाद 10 धावा जमविल्या.
कर्नाटकाच्या पहिल्या डावात करुण नायर आणि रविचंद्रन समरन यांनी शानदार द्विशतके झळकविली. त्यानंतर केरळने 3 बाद 21 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचा पहिला डाव 238 धावांवर आटोपला. केरळ संघातील बाबा अपराजितने 4 षटकार आणि 8 चौकारांसह 88, सचिन बेबीने 4 चौकारांसह 31, रॉजरने 5 चौकारांसह 29, मोहम्मदने 4 चौकारांसह 31 धावा जमविल्या. कर्नाटकातर्फे कविरप्पाने 42 धावांत 4, विशाखने 62 धावांत 3, शिखर शेट्टीने 53 धावांत 2 तर श्रेयस गोपालने 1 गडी बाद केला. दिवसअखेर केरळने बिनबाद 10 धावा जमविल्या आहेत. या सामन्यातील खेळाचा एक दिवस बाकी असून केरळचा संघ 338 धावांनी पिछाडीवर असल्याने कर्नाटकचा संघ हा सामना मोठ्या फरकाने जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
संक्षिप्त धावफलक : कर्नाटक प. डाव 5 बाद 586 डाव घोषित, केरळ प. डाव 95 षटकात सर्वबाद 238 (बाबा अपराजित 88, मोहम्मद 31, सचिन बेबी 31, रॉजर 29, बेसील 12, कविरप्पा 4-42, विशाख 3-62, शेट्टी 2-53). केरळ दु. डाव 3 षटकात बिनबाद 10.
