लोकसाहित्य - लोकसंस्कृतीचा सन्मान
डॉ. तारा भवाळकर यांची पुढील वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या दिल्ली येथील 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचाच सन्मान म्हणावा लागेल. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांच्या या कार्याचा बहुमान होत असताना एकीकडे त्यांना ही संधी आधीच मिळाली पाहिजे अशी लोकभावना आहेच. पण, साहित्य क्षेत्राने निवडणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या हिडीस प्रकाराला बाजूला सारत आपसात चर्चेतून ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाचे नाव निश्चित करण्याची सुरू केलेली प्रथा आणि त्यामुळे डॉ. भवाळकर यांना मिळालेली संधी कौतुकास्पदच म्हटली पाहिजे. मराठी साहित्य क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या अनेकांना या सन्मानापासून वंचित रहावे लागले हा पूर्वइतिहास लक्षात घेता महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे सहित राज्यातील सर्व साहित्य संस्थानी एकत्र येऊन, साधक बाधक चर्चा करून अशा निर्णयापर्यंत येण्याच्या कृतीचेही कौतुक झाले पाहिजे. हे पद भूषवणाऱ्या त्या सहाव्या महिला साहित्यिक ठरत असल्या तरी स्त्राr, पुरुष असा भेद न करता त्यांच्या कार्याचे कौतुक झाले पाहिजे. त्यांनी अभ्यासाचा जो विषय निवडला तो लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोकनाट्या अशा जमिनीशी नाते सांगणाऱ्या विषयाचा आहे. हजारो वर्षे इथल्या मातीत रुजलेला लोक विचार प्रसंगानुरूप समोर येतच असतो. मात्र या प्रवाहाच्या मुळापर्यंत जायचे तर लिखित स्वरूपात फार कमी साहित्य उपलब्ध असताना मौखिक साहित्याला अंधारातून बाहेर काढायचे आणि ते सगळ्या मराठी समूहापर्यंत पोहोचवायचे कार्य मोठेच आहे. यातून एक संस्कृती आणि एक विचार प्रवाहित होत असतो. तो त्या त्या काळाला आकार देण्यास उपयोगात येतो. आपल्या निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना भवाळकर यांनी, आपल्या आधीही मराठीतील अनेक महानुभवानी या परंपरेत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्याबरोबरच हजारो वर्षे जात्यावरच्या ओव्यांमधून, चालीरीती आणि परंपरेतून लोकसाहित्य, लोकसंस्कृती लोकनाट्याचाही प्रवाह अखंडपणे सुरू आहे. या सर्व प्रवाहाचा मी छोटासा भाग आहे, या प्रवाहाचा धांडोळा घ्यायची संधी मला मिळाली. माझ्या पूर्वी आणि माझ्यासोबतही अनेक जण या बहुमानासाठी पात्र होते आणि आहेत. त्या सर्वांच्या सदिच्छांसह मिळालेला हा बहुमान आपण नम्रपणे स्वीकारत आहोत असे म्हटले आहे. डॉ. भवाळकर या मूळच्या नाशिकच्या असल्या तरी प्रदीर्घकाळ त्या सांगलीच्या रहिवासी आहेत. सांगलीच्या नाट्या, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीच्या प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. इथल्या संस्थांना त्यांचा जसा आधार वाटतो तसा तो महाराष्ट्रभरातील मान्यवरांना, विद्वान, संशोधक, अभ्यासक यांनाही वाटत आला आहे. आजही त्या ज्या उत्साहाने या क्षेत्रात कार्यरत आहेत ते कौतुकास्पद आहे. त्यांच्या 42 ग्रंथांसोबतच अलीकडच्या काळातच त्यांनी आपल्या कथांचे रेडिओसाठी स्वत:च अभिवाचन केले. त्यांच्यात हा उत्साह कुठून येतो? असा प्रश्न नवोदितांना सुद्धा पडावा इतक्या त्या प्रत्येक माध्यमाला सामोरे जाताना नवोदित होतात. त्याचे तंत्र एकदा आत्मसात केले की आपल्या शैलीत त्या माध्यमालाच आपल्या प्रवाहाचा भाग बनवतात. त्यांच्या आवाजात त्यांचीच कथा ऐकणे आणि त्या कथेतील पात्रांच्या लकबी समजून घेण्याचे भाग्य अलीकडच्या काळातच सांगलीकरांना लाभले. याशिवाय दूरदर्शनने त्यांची प्रसारित केलेली प्रदीर्घ मुलाखत त्यांच्या आयुष्यभरातील चिंतनाचे आणि अभ्यासाचे संचित समाजासमोर ठेवणारी आहे. माहितीचा महासागर त्यांनी समाजाच्या समोर आणून ठेवला आहे. व्यक्तीचे मोठेपण त्याच्या कर्तृत्वातून दिसत असते. मात्र ते मान्य करायचे की नाही ते ज्याची त्याची मनोवृत्ती आणि ज्याचे त्याचे ज्ञान-अज्ञानच ठरवत असते. अलीकडच्या काळात त्यांचा सीतायन हा ग्रंथ प्रकाशित झाला. रामायण घराघरात शिरोधार्य आहे. वाल्मिकींना प्रत्येक सश्रद्ध माणसाच्या मनात स्थान आहे. वाल्मिकी प्रमाणेच असंख्य लोकांनी आपापल्या पद्धतीने रामायणाची रचना केलेली आहे. ती स्थळ, काळाप्रमाणे वेगवेगळी आहे. रामाची प्रतिमा सुद्धा त्या त्या पद्धतीने बदलत किंवा नवे काही सांगत आलेली आहे. प्रत्येक काळातील समाज रामायणाकडे वळतो तेव्हा त्याचेही काही प्रश्न असतात. पूर्वीच्या काळातील धर्म संस्कृतीने त्या त्या काळातील विचार आणि परंपरांना योग्य तो मानसन्मान दिला. लोकसाहित्यात रुजलेला राम आणि आयाबायांच्या मनातली सीता नेहमीच घराघरात ओव्यांमधून प्रकट झाली. मात्र या लोक विचाराला घेऊन सीतायन लिहिता येईल असा विचार करणारी डॉ. भवाळकर यांच्यासारखी एखादीच लेखिका घडत असते. रामायणाच्या रचनाकारांना जितके महत्त्व त्या काळात आले तितके महत्त्व डॉ. तारा भवाळकर यांच्या रचनेला येण्यासाठी प्रदीर्घ काळ जावा लागेल. समाजाची दृष्टी तितकी व्यापक व्हावी लागेल. अंधार युगातल्या स्त्राrच्या मनातला विचार समाजाचा विचार होण्यासाठी अजूनही प्रदीर्घकाळ जावा लागेल. ज्या काळातील समाजाच्याकडे उन्नत विचारसरणी होती त्या समाजाने त्या स्त्राrच्या ओवीतील भावना समजून घेतली किंवा त्या भावनेचा आदर केला. इतका आदर सीतायणचा होण्यासाठी सीतेशी आणि एकूणच स्त्राrवादाशी एकरूप होणारे समाजमन निर्माण होण्यास खूप काळ जावा लागेल. या समाजमनात स्त्राrमन आणि पुरुषमन दोन्हीचाही समावेश असावा लागेल. हे सांगण्यामागचे कारण इतकेच की, डॉ. तारा भवाळकर यांच्या 65 वर्षांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांनी केलेल्या अद्वितीय कार्यानंतर त्यांना संमेलनाध्यक्ष करण्यासाठी महामंडळाच्या 11 सदस्यांचे मतदान झाले आणि उपलब्ध झालेल्या माहितीनुसार काही महिला साहित्यिकांनी त्यांना विरोध केला. स्त्राrवादी भूमिका घेऊन आयुष्यभर लेखन करणाऱ्या बाईंना स्त्राr सदस्यांनी विरोध करणं हे पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला कलंकित करणारं आहे. कदाचित त्यांच्यावर त्यांच्या विचारधारेचा दबावही असेल. अशाच दबावाची झळ नयनतारा सहगलना बसली होती. ही परंपरा आता महामंडळानं सोडायला हवी. सीतायन साहित्य मंडळातील महिलांच्या मनातही रुजायला सीतेचा वनवासच संपला पाहिजे. भवाळकर यांचे कार्य जर स्वत: स्त्राr असणाऱ्या महामंडळाच्या आदरणीय सदस्यांना उमगण्यास लागणारा वेळ विचारात घेतला तर अजूनही ही परंपरा साहित्यात रुढ होण्यास काळ जावा लागेल. पण हा वनवास संपेलच. तेव्हा सीता कुठेतरी समाजात पाझरत जाईल! प्रा. तारा भवाळकर यांच्यासारख्या असंख्यांचा तो खरा सन्मान असेल!