अक्षय, हरित ऊर्जेवर भर द्या!
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे प्रतिपादन : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहास प्रारंभ
पणजी : नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापराबाबत आता अधिक गंभीर आणि विवेकी होण्याची वेळ आली असून यापुढे अक्षय व हरित ऊर्जा यासारख्या स्रोतांचा विचार करावा लागणार आहे. हे स्रोत आपल्या भावी पिढ्यांसाठी जतन करावे लागणार आहेत, असे प्रतिपादन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. मंगळवारी पणजीत कला अकादमी संकुलात आयोजित राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य वीज अभियंता स्टिफन फर्नांडिस, गोवा विज्ञान केंद्राच्या प्रकल्प समन्वयक संपदा नाईक, यांच्यासह वीज खात्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विविध स्पर्धांचे आयोजन
या कार्यक्रमाचे औचित्य साधून वीज खात्याने ऊर्जा संवर्धनाबाबत जनतेमध्ये जागऊकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धात्मक उपक्रम आयोजित केले होते. त्याचाच भाग म्हणून पोस्टर पेंटिंग, निबंध लेखन, पथनाट्या, जिंगल, रेखाचित्र यासारख्या स्पर्धा पालिका, पंचायत, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, हायस्कूल आणि उच्च माध्यमिक स्कूल यांच्यासाठी आयोजित करण्यात आल्या होत्या.
ऊर्जेबाबत आता विद्यार्थ्यांनी जागृती करावी
पुढे बोलताना ढवळीकर यांनी, औष्णिक वीज निर्मितीतील प्रमुख घटक म्हणजे कोळसा. या कोळशापासूनच 72 टक्के औष्णिक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे प्रदूषण होते. परंतु कोळशाचा हा स्त्राsत आता हळुहळू कमी होत चालला आहे. परिणामी औष्णिक ऊर्जेवर जास्त काळ विसंबून चालणार नाही. त्यासाठी ऊर्जेच्या अन्य स्त्राsतांचा विचार करावा लागणार आहे. त्याचबरोबर भविष्यात ऊर्जा संवर्धनाबाबत जनतेमध्ये जागऊकता निर्माण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी उचलावी, असे आवाहन ढवळीकर यांनी केले.
निसर्ग स्वार्थासाठी नाही : फर्नांडिस
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बोलताना फर्नांडीस यांनी, आपण पर्यावरणाचा नाश करून विकासाची अपेक्षा करू शकत नसल्याचे सांगितले. नैसर्गिक स्त्राsत हे स्वार्थासाठी नसून गरजेसाठी आहेत. ऊर्जा संवर्धनाचे उद्दिष्ट केवळ सरकार पूर्ण करू शकणार नाही. त्यासाठी समाजाचे सहकार्य अपरिहार्य आहे. याकामी विद्यार्थ्यांनी ऊर्जेचे महत्त्व आणि संवर्धनाबाबत जागरूक होणे गरजेचे आहे. भावी पिढीची गरज लक्षात घेऊन ऊर्जास्रोतांच्या वापराबाबतही सावध होण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.
बक्षिसे, पुरस्कारांचे वितरण
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. त्यात प्रामुख्याने पालिका आणि पंचायत स्तरावरील ऊर्जा संवर्धनातील उत्कृष्टतेचा पुरस्कार अनुक्रमे पणजी मनपा आणि कुर्टी खांडेपार ग्रामपंचायत यांना प्रदान करण्यात आला. नागरिक प्रश्नमंजुषा स्पर्धेतील बक्षिसे अनुक्रमे विघ्नेश शेट्यो, श्वेता देसाई, अमुल्य के बी. यांना देण्यात आली. सर्वोत्कृष्ट ऊर्जा संवर्धन क्लबसाठी अनुक्रमे पारितोषिक बाळ्ळी केपे सरकारी हायस्कूल, आल्त दाबोळी येथील केशव स्मृती हायस्कूल आणि मांगूर हील वास्को येथील पीएम श्री सरकारी हायस्कूल यांना प्रथम तीन तर मडगाव येथील आदर्श व्हीव्ही हायस्कूल, सेंट अॅनी हायस्कूल-थिवी, गणनाथ इंग्लिश हायस्कूल-निरंकल फोंडा, जीएचएस आंबावली केपे आणि युनियन हायस्कूल आसगाव यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. प्रांजली पालेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी अभियंता राजीव नाईक यांनी आभार मानले.