विकास, निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा
निवडणुका बहुमताने जिंकून पक्षाला पुन्हा सत्तेवर आणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्र्यांसह भाजपला सल्ला
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्याचा विकास बहुआयामी पद्धतीने होत असल्याने गोवा राज्य मंत्रिमंडळ बदल किंवा फेररचना न करता गोव्याच्या विकासावर आणि 2027 च्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रित करण्याचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दै. ‘तरुण भारत’ला दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोव्याच्या विकासाबाबत व प्रकल्पाबाबत समाधानी असून, राज्याच्या हितासाठी केंद्राकडून हवी ती मदत यापुढेही मिळण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवलेला आहे. मुख्यमंत्र्यांवर पंतप्रधान मोदी यांचा विश्वास असून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी राज्याच्या विकासाबाबत चर्चा केली. गोवा सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांना देताना राज्याचा विकासाबाबत पंतप्रधानांचे बहुमूल्य मार्गदर्शन घेतले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली 2027 मधील विधानसभा निवडणूक लढविण्यात येणार असून, पक्षाला बहुमताने विजयी करण्यासाठी आता विधानसभा निवडणुकीवरच लक्ष्य केंद्रीत करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, सरकारातील कोणत्याच मंत्र्यांची खाती बदलण्याची गरज नसल्याने मंत्रिमंडळ फेररचना करू नये, असे केंद्रातूनच ठरल्याने आता आपण राज्याच्या विकासावरच अधिक लक्ष दिले असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ व पारंपरिक शाल भेट देऊन त्यांचा सन्मान केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट मुख्यमंत्री सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी घेतली.
हेलिकॉप्टर दुरुस्ती प्रकल्प लवकरच
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्यासाठी भरभरून मदत केलेली आहे. गोवा हे देशासाठी अनेकार्थाने महत्त्वपूर्ण राज्य असल्याने आता होंडा-सत्तरी येथे लवकरच हेलिकॉप्टर दुरुस्ती प्रकल्प येणार आहे. यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही सकारात्मक पाठिंबा दिला असल्याने हा प्रकल्प राज्यासाठी लौकीक ठरेल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यातील ‘ते’ नेते बिनधास्त, ‘तरुण भारत’चे कौतुक
गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मंत्रिमंडळात बदल होणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. यामध्ये अनेक इच्छुक आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. काही आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. परंतु सर्वप्रथम दै. ‘तरुण भारत’ने राज्यातील मंत्रिमंडळात फेररचना होणार नसल्याचे वृत्त काल गुरुवारी प्रसिद्ध केल्यानंतर अनेक मंत्र्यांनी संपर्क साधून आता आपण निवडणुकीपर्यंत बिनधास्त असल्याचे सांगून ‘तरुण भारत’चे कौतुकही केले.