महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लक्ष 24 डिसेंबरकडे

06:11 AM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अवघ्या विश्वाला वर्षाअखेरीचे वेध लागले आहेत. वर्षाअखेरीच्या अनेक योजना, सेलिब्रेशन आणि नवी डायरी, नवे कॅलेंडर यासह नवी स्वप्ने, नवे संकल्प यासाठी जोरदारपणे सगळीकडे तयारी सुरू आहे. शेअर बाजार आणि सोने चांदी बाजार रोज नव्या दरांचे विक्रम करतो आहे. भांडवली बाजारामुळे जीजीभाई टॉवरमध्ये उत्साहाचे लाडू वाटले आहेत. रिअल इस्टेटमध्येही तेजी पिंगा घालते आहे. एकिकडे हे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असताना संसदेत मात्र सुमारे 141 खासदारांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत या निलंबनाचा जोरदारपणे निषेध तर होतो आहेच पण, तोंडावर असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. खर्गे हे काँग्रेसच्या राजकारणात मुरलेले आहेत. नरेंद्र मोदी विरूद्ध खर्गे ही लढत पाहणाऱ्या मित्रांना ते ओळखून आहेत. जोडीला त्यांना पक्षांतर्गत दरबारी व कारभारी राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे एक क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी ही ऑफर नाकारली व निकालानंतर नेता व पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करू, असे सांगितले. खर्गे यांच्या या भूमिकेतून अनेक अर्थ व्यक्त होत आहेत. तूर्त 28 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत व त्यांनी ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, शरद पवार, अखिलेश यादव, नितीश कुमार असे कोणतेही एक नाव न निवडता उडला तर पक्षी, बुडला तर बेडूक अशी भूमिका घेतली आहे. पण, इंडिया आघाडीत मतदानपूर्व मोठ्या भावाची भूमिका काँग्रेसकडेच आहे हे ध्वनीत केले आहे. मावळत्या वर्षाला निरोप दिल्यावर हळूहळू राजकीय पटलावर देशपातळीवर हालचाली होतील अजून आयाराम, गयाराम याचा खेळ बहरात येईल आणि जातीय, धार्मिक मतपेट्या बळकट केल्या जातील. याच दरम्यान, अयोध्येत राममंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा हा महाइव्हेंट होईल व त्यानंतर निवडणुकीचा बिगूल वाजेल. पाच पैकी तीन मोठी राज्ये भाजपाने जिंकल्याने भाजपाची आणि मोदी-शहांची हवा तेज झाली असली तरी अजून घोडामैदान लांब आहे आणि लढाई केवळ हवेवर लढता येत नाही. त्यामुळे तिकीट वाटप, मतांची गोळाबेरीज प्रचाराचे मुख्य मुद्दे यासह पावसात कोण भिजतो आणि थंडीत कोण कुडकुडतो असे भावनिक मुद्दे निकाल प्रभावीत करत असतात. निवडणुकीची रणवाद्ये वाजत असतानाच काही राज्यात पाऊस आणि ढगफुटीने होत्याचे नव्हते झाले आहे. तर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात जातीच्या मतपेट्या आणि आरक्षणासाठीची आंदोलने जोरावर आहेत. आमदार, अपात्रता, मंत्रीमंडळ विस्तार यासह अनेक विषयावर धुळवड सुरूच आहे. मराठा समाजाचे नवे नेते जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला आहे आणि मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात याप्रश्नी येत्या फेब्रुवारीत आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन घेणार अशी घोषणा केली आहे. राज्यात दंगली होणार असे भाकीत काही नेते मंडळी वारंवार बोलून दाखवत आहेत आणि सरकारने दिलेला शब्द पाळावा तसेच येत्या 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसू असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. खरे तर मराठा आरक्षण हा विषय सामाजिक आहे. मराठा समाजातील गरीब, आर्थिक मागास व बेरोजगार युवा युवतीने रोजगार मिळवण्यासाठी समाजाचे लाखो नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. जरांगे पाटील त्यांचे नेतृत्व करीत आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार या समाजाला आरक्षण देताना अन्य कुणाच्या विशेषत: ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असे वारंवार म्हटले आहे. पण, हा विषय ऐरणीवर असताना मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा देणे मुख्यमंत्र्यांनी आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलावणे यांचे वेगळे अर्थ काढले जात आहेत. राज्यात दहशतवादी हालचालीही वाढत असताना दिसत आहेत. यातच हे विषय आणि वर्षअखेर यामुळे पुढील काही दिवस ताण तणावाचे असणार हे उघड आहे. जागतिक अर्थव्यवस्था आणि यंत्रशास्त्र, तंत्रशास्त्र यामधील बदल जगभर नव्या बदलांचे संकेत देत आहेत. या संकेताचा मूळ अर्थ आहे नफा वाढणार असला अर्थव्यवस्था भक्कम होणार असली तरी कार्यपद्धती यंत्रकौशल्ये यामुळे बेरोजगारी अधिकच वाढणार आहे. अनेक तरूणांना नोकऱ्याच नसतील आणि असल्या तरी त्या तांत्रिक कौशल्यावर आधारित असतील अशावेळी सरकारने गरीब, मागास आणि प्रगतीपासून वंचित जाती जमातीच्या कल्याणाचे धोरण आखून ते त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे, पण तसे फार होताना दिसत नाही. उलट या विषयाला अनेक फाटे फोडून जाती धर्मात भांडणे, वाद, संघर्ष होतील अशा भूमिका घेतल्या जात आहेत. हे तातडीने थांबले पाहिजे. ग्रामिण विकास, उर्जेचे नवे स्त्राsत, यंत्रमानवापासून ड्रोन टेक्नॉलॉजीपर्यंत आणि लहान मोठ्या सेवा उद्योगापर्यंत अनेक क्षेत्रात कुशल मनुष्यनिर्मिती केली पाहिजे. पण, तसे फारसे होताना दिसत नाही. मतपेटीवर व सत्तेवर डोळा ठेऊनच जाती धर्म परस्परात लढताना दिसत आहेत. यामागे राजकारणी, कावेबाज नेत्यांचा डाव आहे. तो ओळखून लोकांनी तो हाणून पाडला पाहिजे. शेतीत मोठी ताकद आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा तर आहेच पण उर्जादाता आणि रोजगार निर्मिती करणारा मुख्य घटक आहे. शेतीचे आधुनिकीकरण आणि पर्यावरण रक्षण यावर प्रामुख्याने भर देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने वाटचाल होणारी पावले उचलली गेली पाहिजेत तसेच शाश्वत व कल्याणकारी विकासावर अधिकच भर दिला पाहिजे. त्याचप्रमाणे राजकारणांचेही शुद्धीकरण केले पाहिजे. व्यसनी, बेरोजगार व भरकटलेल्या युवा पिढीला योग्य मार्गावर आणून प्रगतीची नवी शिखरे सर केली पाहिजेत. अन्यथ: शेअर बाजार नवे विक्रम करेल, अर्थव्यवस्था अधिक अव्वल होईल पण,देशातील माणसे जात, धर्म, स्वार्थ यामध्ये लोळागोळा होऊन संपून जातील. आता अनेक गोष्टींचे निवाडे काय होतात आणि त्यातून निर्णय कोणते घेतले जातात हे बघावे लागेल पण, यंदाच्या वर्षअखेरीस अनेक ताण तणाव आणि समस्या दिसत आहेत. लोकांचे लक्ष येणाऱ्या 24 तारखेकडे नक्कीच आहे.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article