उडत्या कॉफीचे रेस्टॉरंट
सध्या अटोमेशनचे युग आहे. मानवी हातांपेक्षा प्रत्येक काम यंत्राकडून किंवा यंत्रमानवाकडून करुन घेण्याकडे लोकांचा कल आहे. अगदी विनाचालक कार्सही लवकरच लोकप्रिय होतील अशी शक्यता आहे. यंत्रमानव किंवा रोबोटच्या निर्मितीत माणसाने मोठी प्रगती केली असून हे यंत्रमानवच्या यापुढे मानवाचे प्रत्येक काम करु लागतील, अशी शक्यता आता स्पष्टपणे समोर दिसत आहे. यंत्रमानवाप्रमाणेच ड्रोन तंत्रज्ञानातही मोठीच क्रांती झाली आहे. अगदी छोट्या कीटकाच्या आकारमानाइतके ड्रोन्सही निर्माण केले जात आहेत. अनेक हॉटेलांमधून हे ड्रोन्स आता वेटरची जागा घेऊ लागतील अशी शक्यता आता भारतातही निर्माण झाली आहे. हा सर्व कृत्रिम बुद्धीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे. कोलकात्यातील एका हॉटेलात आता ग्राहकांना चहा-काँफी पुरविण्यासाठी ड्रोन्सचा उपयोग केला जात आहे. ग्राहकाने कॉफी किंवा चहाची मागणी करताच त्याच्यापर्यंत चहाचा पेला अक्षरश: उडत येतो. कारण तो ड्रोनच्या माध्यमातून पाठविलेला असतो. अशी ड्रोन सेवा या शहरातील अनेक रेस्टॉरंटस्ची आहे.
ही बाब ग्राहकांसाठी आश्चर्याची ठरत आहे. केवळ ड्रोनचा हा चमत्कार पाहण्यासाठी अनेक लोक रेस्टॉरंटमध्ये जात असून तेथे चहा किंवा कॉफीची ऑर्डर देतात. त्यामुळे या रेस्टॉरंटस्च्या ग्राहक संख्येतही वाढ होताना दिसून येते. सध्या ही ड्रोन सेवा चहा-कॉफीपुरती मर्यादित असली तरी भविष्यकाळात ती अन्य पदार्थांसाठीही उपयोगात आणता येईल, अशी शक्यता आहे. ड्रोन तंत्रज्ञानामुळे सेवा स्वच्छपणे आणि वेगाने देता येते. तसेच वेटरचे ग्राहकांशी होणारे वादाचे प्रसंग टाळता येतात, असा रेस्टॉरंट चालकांचा अनुभव असल्याचे प्रतिपादन आहे. अर्थात, या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे काही तोटेही आहेत. सर्व कामे यंत्रांकडून होऊ लागली तर एवढ्या मोठ्या मानवी लोकसंख्येला काम कसे मिळणार आणि काम न मिळाल्यास ती खाणार काय असेही प्रश्न आहे. एका बाजूला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विस्तार आपण रोखू शकत नसलो, तरी ही मानवाची दुसरी बाजू लक्षात घेणेही तितकेच महत्वाचे आहे. हा सुवर्णमध्ये नेमका केव्हा, कुठे आणि कसा साधला जाणार हाच प्रश्न मानवाला पुढच्या काळात भेडसावणार आहे.