For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्लाय ९१ कडून पुणे–सिंधुदुर्ग विमानसेवेच्या उड्डाणसंख्येत वाढ

03:53 PM May 14, 2025 IST | अनुजा कुडतरकर
फ्लाय ९१ कडून पुणे–सिंधुदुर्ग विमानसेवेच्या उड्डाणसंख्येत वाढ
Advertisement

पर्यटन आणि प्रवासाला नवा गतीमान पर्याय

Advertisement

सावंतवाडी -

सिंधुदुर्गातील परुळे येथील चिपी विमानतळावरून फ्लाय९१ या विमान कंपनीने पुणे–सिंधुदुर्ग विमानसेवेची उड्डाणसंख्या वाढवली असून आठवड्यातून दोनदा होणारी वाहतूक आता पाचवेळा सुरु झाली आहे . याचा फायदा सिंधुदुर्गातून पुणे येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे . उन्हाळा संपत आला असला तरी पुणे–सिंधुदुर्ग दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. अनेक कुटुंबे अजूनही आपल्या मूळ गावांकडे मार्गस्थ होत असून खास करून कुलदेवतांच्या दर्शनासाठी , परंपरागत समारंभ, धार्मिक विधी आणि उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असून फ्लाय ९१ कडून सुरू करण्यात आलेल्या वाढीव उड्डाणांमुळे हा प्रवास आता अधिक सोयीचा आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे .

Advertisement

सिंधुदुर्गात येण्यासाठी अनेकदा प्रवाशांना रस्तेमार्गाचा अवलंब करावा लागतो, जो वेळखाऊ, कष्टदायक आणि थकवणारा असतो. मात्र, आता आठवड्यातील पाच उड्डाणांद्वारे पुणे–सिंधुदुर्ग मार्ग मजबूत करत फ्लाय९१ प्रवाशांसाठी ही यात्रा अधिक सोयीची करत आहे,”असे फ्लाय९१चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले.“या उड्डाणांमुळे कुटुंबीयांच्या भेटी, विद्यार्थ्यांची आणि व्यावसायिकांची ये-जा तसेच पर्यटन क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार आहे. गोवा आणि सिंधुदुर्गला पुण्यासह जोडणे म्हणजे केवळ प्रवास सुलभ करणे नव्हे, तर पर्यटन व व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण करण्याचे पाऊल आहे,” असेही त्यांनी नमूद केले.वाढती हवाई सेवा सिंधुदुर्गच्या निर्यातप्रधान अर्थव्यवस्थेला नवे उभारी देत आहे. आंबा, काजू, समुद्री खाद्यपदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्न यांसारखी उत्पादने आता पुण्याच्या हवाई मार्गातून अधिक जलद आणि कार्यक्षमतेने बाजारात पोहोचवता येणार आहेत. यामुळे शेतकरी, अन्नप्रक्रिया उद्योजक आणि लॉजिस्टिक्स व्यावसायिक यांना मोठा फायदा होणार असून, संपूर्ण परिसरातील आर्थिक घडी अधिक बळकट होईल.फ्लाय९१ कडून सिंधुदुर्ग–पुणे–सिंधुदुर्ग या मार्गावरील उड्डाणांची वाढती वारंवारता स्थानिक नागरिकांना पुण्यासारख्या व्यापार, सेवा आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहराशी सहज जोडण्यास मदत करेल," असे कॅप्टन जय सिंग सडाना (मुख्य सल्लागार व प्रमुख – सिंधुदुर्ग विमानतळ,आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड यांनी सांगितले. "यामुळे केवळ स्थानिक प्रवाशांनाच नाही, तर पुणे व परिसरातील पर्यटकांनाही सिंधुदुर्गसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या पर्यटनस्थळाकडे आकर्षित करता येईल," असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.