फुलांचे दर कोमजले, श्रावणात बहरणार
कोल्हापूर / दीपक जाधव :
यावर्षी मे महिन्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे फुलांचे भाव गुरूपौणिमेपर्यंत दीडपट वाढले होते. गुरुपौर्णिमेला फुलांचा दर उच्चांकी होता. मात्र सध्या फुलांच्या भावात प्रचंड घसरण झाली. सर्वच फुलांचे दर निम्याहुन अधिक खाली आले आहेत. धार्माक व्रत- वैकल्याचा श्रावण महिना चार दिवसांवर आला असून या दिवसात गुरुपौर्णिमेप्रमाणे भाव वाढणार नाहीत पण श्रावणातील पहिला आठवडा थोडे भाव वाढलेले राहतील, असे फुलविक्रेत्यांचा अंदाज आहे.
गेल्या काही दिवसांपासून फुलांची आवक देखील वाढली आहे. तुलनेने मागणी कमी आहे. आठवडाभरात फुलांना सर्वाधिक मागणी गुरुवारी असते. त्यामुळे भाववाढीचा अंदाज असतो. नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात फुलांची विक्री चौपट वाढली होती. तर भावदेखील तिपटीने वाढले होते. 70 रुपये किलोचे निशिगंधा चक्क 200, तर 700 रुपये किलोचा मोगरा 1000 रुपये झाला
होता. त्यामुळे श्रावण महिन्यात फुलांचे दर काय असतील. याची चिंता ग्राहकांना आहे.
सध्या कोल्हापूर मार्केटमध्ये स्थनिक हेर्ले, माले, हळदी, कांडगाव, राधानारी, मुडशिंगी, कागल आदी भागातून फुलांची आवक होते.तर मिरज, आष्टा व वाळवा परिसरातूनही फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर होत असते.
- श्रावण महिन्यासह सणांच्यावेळी मागणी
श्रावण महिन्यात फुलांना मागणी दुपटीने वाढते. मात्र आवक वाढणार असल्याने दरात केवळ 15 ते 20 रुपयांची वाढ होऊ शकते. श्रावण महिन्यात चार श्रावण सोमवार याशिवाय नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, अंगारकी चतुर्थी स्वातंत्र्यदिन आदी सण व उत्सव असून यावेळी फुलांना मागणी असते.
- भाव चांगला मिळेल
सध्या पाऊस थांबला आहे. आणि नव्याने आलेली फुले बाजारात येत आहेत. फुलांची आवक वाढल्याने भाव पडले आहेत.पण गुरूपौमिमेला जो भाव होता तो भाव चार दिवसांनी चालु होणाऱ्या श्रावण महीन्यात मिळेल अशी शक्यता आहे.
-मनोज ठक्कर. होलसेल फुल व्यापारी.
- पावसाने नुकसान
सध्या फुलानां दर नाही. गेल्या आठवड्यात दर चांगला होता.दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची फुलांची रोपे पावसात गेली. त्यामुळे फुलांची आवक कमी झाली. पर्यायाने दर वाढले होते. आज जरी दर कमी असला तरी श्रावणात फुलांना चांगला दर येण्याची आशा आहे.
-सुनिल शेवाळे, फुल उत्पादक, शेंडुर,कागल.
- होलसेल फुलांचे दर असे (किलोप्रमाणे)
प्रकार आठ दिवसांपूर्वी आजचे दर
मोगरा 1 बंडल 1000 700
निशिगंधा 200 70
गुलाब गड्डी 400 150
झेंडू 150 40
पांढरी शेवंती 150 70
गलाडां 200 80