For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वनडेत फ्लॉप, पण टी-20 त टॉप

06:58 AM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
वनडेत फ्लॉप  पण टी 20 त टॉप
Advertisement

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार यादवची 42 चेंडूत 80 धावांची वादळी खेळी :  टी-20 मध्ये सूर्याची शानदार कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

वनडे वर्ल्डकपमधील दु:ख विसरुन टीम इंडियाने आता 2024 च्या टी-20 वर्ल्डकप विजयासाठी मोहीम सुरु केली आहे. कॅप्टन या नात्याने जोरदार सुरुवात करताना सूर्यकुमारने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवत आपली चुणूक दाखवून दिली. याच सूर्यकुमारवर काही दिवसापूवी वर्ल्डकप फायनलमधील कामगिरीवर जोरदार टीका होत होती पण कालच्या सामन्यात सूर्याने जबरदस्त खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. वनडेमध्ये फ्लॉप ठरणारा हा फलंदाज टी-20 मध्ये खोऱ्याने धावा काढतो कसा?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

25.77 च्या सरासरीने आणि 105.03 च्या स्ट्राइक रेटसह 37 सामने तर 46.85 च्या सरासरीसह आणि 173.38 इतका कडक स्ट्राइक रेट, हे सूर्यकुमार यादवच्या वनडे आणि टी-20 क्रिकेटचे आकडे आहेत. एकीकडे टी-20 मध्ये सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या सूर्याची वनडेत मात्र कामगिरी ठिकठाक आहे. सूर्याच्या याच कामगिरीचा घेतलेला आढावा. सूर्यकुमारच्या टी-20 मधल्या कामगिरीचे सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्याचा फलंदाजीला येण्याचा क्रमांक. टी-20 सामन्यात तो तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. पण वनडेमध्ये मात्र पाचव्या स्थानावर खेळायला येतो. त्यामुळे त्याला खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी तितकासा वेळ मिळत नाही. वनडेत भारताची सलामीची फळी तगडी असल्यामुळे त्यांच्याकडे धावा करण्यासाठी पुरेसा वेळ असतो. पाचव्या पिंवा सहाव्या स्थानी खेळणाऱ्या सूर्याला फारसा वाव मिळत नाही. यामुळे आतापर्यंत सूर्याला 37 वनडे सामन्यात 4 अर्धशतकासह केवळ 773 धावा करता आल्या आहेत.

टी-20 मध्ये आक्रमक फलंदाजी

सध्याच्या घडीला आयसीसी टी-20 क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादव पहिल्या क्रमांकावर आहे आणि सध्या तो या फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. विशेष म्हणजे, टी-20 मध्ये गोलंदाजांची मानसिकता वेगळी असते. गोलंदाजांना पहिल्या चेंडूपासूनच धावा रोखण्यावर भर द्यावा लागतो. त्यामुळे त्यांची लाईन-लेंग्थ वेगळी असते. सूर्याला गोलंदाजांची ही रणनिती चांगलीच अवगत झाली आहे. पण वनडेमध्ये परिस्थिती वेगळी असते. गोलंदाजांचा धावा रोखण्यापेक्षा विकेट घेण्याकडे कल असतो. पण सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला यावं लागत असल्यामुळे सूर्याला टी-20 सारखीच फलंदाजी करावी लागते. परिणामी विकेट जाण्याची जास्त शक्यता असते.

सूर्याला वनडेत फारसे यश मिळाले नसले तरी, या टी-20 मध्ये मात्र 3 शतके आणि 16 अर्धशतके त्याच्या खात्यावर आहेत. वनडेत मात्र त्याला केवळ चार अर्धशतके करता आली आहेत. विशेष म्हणजे, टी-20 मध्ये त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. मैदानावर उतरल्यावर धावा कशा करायच्या याचं गणित त्याला चांगलेच उमगले आहे पण वनडेत अद्यापही तो स्थिरावलेला नाही. फलंदाजीची संधी मिळेलच असं नाही, यामुळेच त्याच्या कामगिरीत बरेच चढ उतार राहिलेले आहेत. अर्थात, वर्ल्डकप फायनलमध्ये याचा प्रत्यय आला असला तरी मागील सारे विसरत तो आता कर्णधार या नात्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी सज्ज झाला आहे. पहिल्या टी-20 सामन्यात सूर्याने 42 चेंडूत 80 धावांची जबरदस्त खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. अर्थात, कोणताही खेळाडू तीनही फॉरमॅटमध्ये यशस्वी असला पाहिजे असे काही सूत्र नाही. सूर्याची टी-20 मधील कामगिरी पाहता आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये त्याच्या कामगिरीचा फायदा संघाला होऊ शकतो, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे.

पहिल्याच सामन्यात विजय ही सन्मानाची बाब : कर्णधार सूर्यकुमार

पहिल्या सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार खूपच खुश झाल्याचे पहायला मिळाले. कर्णधार म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना टीम इंडियाने मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत विजयाला गवसणी घातली. सामन्यानंतर त्याने रिंकू सिंग, इशान किशनचे खास कौतुक केले. माझ्यासाठी ही खूपच सन्मानाची बाब आहे की, मी भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. माझ्या नेतृत्वाची यापेक्षा चांगली सुरुवात होऊच शकत नव्हती. पुढील सामन्यातही शानदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे तो म्हणाला.

अखेरच्या चेंडूवर षटकार तरीही रिंकूला सहा धावा मिळाल्या नाहीत

गुरुवारी भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यातील सामन्यातील शेवटचे षटक अतिशय रोमांचक होते. या षटकात टीम इंडियाच्या 3 विकेट पडल्या आणि रिंकू सिंगने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. पण या 6 धावा रिंकूला मिळाल्या नाहीत. शेवटच्या चेंडूवर एक धाव हवी होती. त्यावेळी रिंकू स्ट्राईकवर होता. तो आऊट झाला असता तर हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता, पण तसे झाले नाही. अॅबॉटच्या चेंडूवर रिंकूने षटकार ठोकला. पण या 6 धावा रिंकूच्या खात्यात जमा झाल्या नाहीत कारण अॅबॉटचा पाय क्रीजच्या बाहेर होता आणि पंचांनी हा चेंडू नोबॉल ठरवला. तसेच, भारताला विजयासाठी केवळ एकच धाव हवी होती. यामुळे षटकाराआधी केवळ नो बॉलची अवांतर एक धाव धावांमध्ये जोडली गेली आणि तेथेच भारताने सामना जिंकला. यामुळे रिंकू सिंगने षटकार ठोकल्यानंतर त्याच्या धावा भारतीय धावांमध्ये जोडल्या गेल्या नाहीत.

रिंकूने विजयाचे क्रेडिट दिले धोनीला

आयपीएल दरम्यान महेंद्रसिंग धोनीशी दोन वेळा बोललो होतो. दबावाच्या वेळी कसे शांत राहायचे हे त्यावेळी त्यांनी मला सांगितले होते. हीच गोष्ट मी कालच्या सामन्यात केली, असे युवा खेळाडू रिंकू सिंगने सामन्यानंतर सांगितले. या गोष्टीचा मला अनेक वेळा फायदा झाल्याचे त्याने यावेळी आवर्जुन सांगितले.

ऋतुराज गायकवाड ‘डायमंड डक’चा बळी

टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालच्या एका चुकीमुळे ऋतुराज गायकवाडला आपली विकेट गमवावी लागली. या सामन्यात ऋतुराज आणि अर्शदीप सिंग यांची विकेट चर्चेचा विषय राहिली. ऋतुराज एकही चेंडू खेळू शकला नाही, तो शून्यावर बाद झाला. त्यांच्या विकेटनंतर डायमंड डक हा शब्द कानी पडला होता. डायमंड डक म्हणजे काय? असा प्रश्न सर्वांना पडला होता. जेव्हा एखादा खेळाडू कोणत्याही चेंडूचा सामना न करता नॉन स्ट्राईकवर उभा असतो आणि धावा घेताना तो शून्यावर धावबाद होतो, तेव्हा त्याला डायमंड डक म्हणतात. टी-20 क्रिकेटमध्ये अशाप्रकारे बाद होणारा ऋतुराज गायकवाड हा तिसरा तर अर्शदीप सिंग हा डायमंड डक होणारा चौथा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी जसप्रीत बुमराह 2016 मध्ये आणि अमित मिश्रा 2017 मध्ये चेंडू न खेळताच बाद झाले होते.

सामना एक, विक्रम अनेक

  1. वर्ल्डकप फायनलनंतर सुरु झालेल्या टी-20 मालिकेतील पहिल्याच लढतीत अनेक विक्रम पहायला मिळाले. विशाखापट्टणम येथे झालेल्या या लढतीत स्टेडियम खचाखच भरलेले पहायला मिळाले. चाहत्यांचा उत्साह तरी इतका होता की गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
  2. 42 चेंडूत 80 धावांची खेळी साकारणाऱ्या सूर्यकुमारला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. हा त्याचा टी-20 कारकीर्दीतील 13 वा सामनावीर पुरस्कार आहे. टी-20 मध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने रोहित शर्माला (12) मागे टाकले. सूर्यापुढे आता मोहम्मद नबी (14) आणि विराट कोहली (15) आहेत.
  3. भारतीय संघाने टी-20 मध्ये विक्रमी पाचव्यांदा 200 किंवा त्याहून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. याबाबतीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला (4) पछाडले आहे. तसेच, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी 3 वेळा 200 किंवा त्याहून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
  4. या सामन्यात भारताने टी-20 मधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. यापूर्वी भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 2019 मध्ये 208 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

Advertisement
Tags :

.