पाकिस्तानात पूरामुळे हाहाकार
20 लाख लोकांचे पलायन : 854 जणांचा मृत्यू : 2200 गावे पाण्याखाली
वृत्तसंस्था/ लाहोर
भारतातून वाहत पाकिस्तानात जाणाऱ्या रावी, सतलज आणि चिनाब नद्यांना मोठा पूर आला आहे. भारतातील पंजाब राज्य देखील भीषण पूराला सामोरे जात आहे, तर याच नद्यांमधील पाणी आता पाकिस्तानातील नुकसानीचे कारणीभूत ठरले आहे. पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतात आलेल्या भीषण पुरामुळे लाखो लोक प्रभावित झाले आहेत. पंजाब प्रांतातील 2200 हून गावांमधील 20 लाखाहून अधिक लोकांना स्वत:चे घर सोडावे लागले आहे. तर मागील आठवड्यात अतिवृष्टी आणि भारताकडून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने चिनाब, रावी आणि सतलज नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. पाकिस्तानच्या पंजाबच्या ग्रामीण भागांसह शहरी क्षेत्र म्हणजेच लाहोर देखील जलमय झाले आहे.
पाकिस्तानच्या प्रशासनाने मदत तसेच बचावकार्य सुरू केले असून यात तेथील सैन्य, पोलीस आणि अन्य यंत्रणा सामील आहेत. आतापर्यंत 7 लाख 50 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पुरामुळे 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून पशू आणि संपत्तीचेही मोठे नुकसान झाले आहे. तर सिंध प्रांतात प्रशासनाने ‘सुपर फ्लड’चा अलर्ट जारी केला आहे. सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह याहंनी गु•t आणि सक्कर बॅराजचा दौरा करत तयारींची समीक्षा केली. पाण्याचा विसर्ग 9 लाख क्यूसेक किंवा त्याहून अधिक झाल्यास सिंधच्या समारे 15 जिल्ह्यांमध्ये मोठी हानी होण्याचा धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिंध प्रशासनाने धरणे आणि नदीकाठावरील देखरेख वाढविली असून पोलीस पिकेट्स स्थापन करण्यात येत आहेत.
भारताकडुन सतलज समवेत अन्य नद्यांमध्ये अतिरिक्त पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानातील स्थिती आणखी बिघडू शकते, खासकरून लाहोर समवेत आसपासचे भाग प्रभावित होऊ शकतात. याचबरोबर भारताकडून पाण्याच्या विसर्गाची माहिती दिली जात नसल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.