नेपाळमध्ये पूर, भूस्खलनामुळे मोठी हानी
आतापर्यंत 112 जणांचा मृत्यू : 68 बेपत्ता : 56 जिल्ह्यांमध्ये अलर्ट
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळमध्ये मागील 24 तासांमध्ये पूर आणि भूस्खलनमुळे 112 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 68 जण बेपत्ता असून 100 हून अधिक जण जखमी झालेआहेत. नेपाळ सशस्त्र पोलीस दलानुसार रविवारी सकाळपर्यंत कावरेपालन चौकात एकूण 34 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत.
तर ललितपूरमध्ये 20, धाडिंगमध्ये 15, काठमांडूत 12, मकवानपूरमध्ये 7 , सिंधूपालचौकमध्ये 4, दोलखामध्ये 3 आणि पंचथर तसेच भक्तपूर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 5 मृतदेह सापडले आहेत. धनकुटा आणि सोलुखुम्बू येथे प्रत्येकी दोन आणि रामछाप, महोत्तरी तसेच सुनसारी जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक मृतदेह आढळून आला आहे.
काठमांडू खोऱ्यात प्रचंड नुकसान
अतिवृष्टीमुळे काठमांडू खोऱ्यात मोठे नुकसान झाले आहे. नेपाळ सैन्य, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलिसांना मदत आणि बचावकार्यात सामील करण्यात आले आहे. तर नुकसानीचा आढावा घेतला जात असल्याची माहिती नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी दिली आहे.
56 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये शनिवारी 323 मिलिलिटर पावसाची नोंद झाली आहे. मागील 54 वर्षांमध्ये एका दिवसात झालेला हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने देशातील 77 पैकी 56 जिल्ह्यांना अतिवृष्टीच इशारा जारी केला आहे. तसेच प्राधिकरणाने लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
चार लाख लोक प्रभावित
पूर आणि भूस्खलनामुळे सुमारे चार लाख लोक प्रभावित झाल्याचा प्राधिकरणाचा अनुमान आहे. नेपाळमध्ये मान्सून 13 जूनच्या आसपास दाखल होण्यास सुरुवात होते आणि सप्टेंबरच्या अखेरीस मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होतो. नेपाळच्या हवामान कार्यालयानुसार देशात शुक्रवार सकाळपर्यंत 1586.3 मिलिमीटर पाऊस पडला आहे. मागील वर्षी 1303 मिलिलीटर पावसाची नोंद झाली होती