For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईशान्य भारतात पूरपरिस्थिती गंभीर

06:55 AM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
ईशान्य भारतात पूरपरिस्थिती गंभीर
Advertisement

आतापर्यंत 36 मृत्यू, साडेपाच लाख लोक बाधित

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मान्सूनच्या प्रचंड पावसामुळे ईशान्य भारतात पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. गेले सात दिवस या भागातील सर्व सात राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वृष्टी होत आहे. त्यामुळे 36 जणांचा मृत्यू झाला असून साडेपाच लाखांपेक्षा अधिक लोकांवर परिणाम झाला आहे. या राज्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Advertisement

पूर आणि भूस्खलन यांच्यामुळे आसाम राज्यात सर्वाधिक हानी झाली आहे. या राज्यात गेल्या तीन दिवसांमध्ये 11 जण पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. लाखो लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने ते संकटात सापडले आहेत. अनेकांना सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा लागला आहे. अरुणाचल प्रदेशात 10, मेघालयमध्ये 6, मिझोराममध्ये 5, सिक्कीममध्ये 3 तर त्रिपुरामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आसाममध्ये साडेतीन लाख लोक बेघर झाले आहेत. या राज्याच्या 22 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी सर्वाधिक हानी झालेल्या लखीमपूर जिल्ह्याला भेट देऊन पाहणी केली. विस्थापितांना त्यांनी शक्य ते सर्व साहाय्य करण्याचा आदेश दिला आहे.

सिक्कीममध्ये भूस्खलन

सिक्कीमच्या चेतान भागात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या भागातून अनेक लोकांचे स्थलांतर करण्यात आले. यासाठी एम आय हेलिकॉप्टर्सचा उपयोग करण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या भूस्खलनामुळे अडकलेल्या पर्यटकांपैकी काही जणांची सुटका करण्यात आली आहे. तसेच या भूस्खलनात जखमी झालेल्या सहा सैनिकांवरही सुरक्षितस्थळी उपचार करण्यात येत आहेत. एनडीआरएफचे 23 जणांचे एक दल येथे पाठविण्यात आले आहे.

मंगान येथे हानी

29 मे पासून कोसळणाऱ्या पावसामुळे सिक्कीमच्या मंगान जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे. फिडांग आणि संगकालांग येथे अनेक सेतूंची हानी झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याची सूचना करण्यात आली आहे. अनेक खेड्यांचा मुख्य भूप्रदेशाशी संपर्क तुटला आहे. या राज्यात सोमवारी एका दिवसात 13 सेंटीमीटर पाऊस पडल्याने अनेक पर्यटनस्थळे पाण्याखाली गेली आहेत. त्यांच्याकडे जाणारे रस्तेही बंद झाल्याने अनेक पर्यटक अडकले आहेत.

अरुणाचलात नद्या धोकादायक

अरुणाचल प्रदेश राज्याला सोमवारी प्रचंड पावसाने झोडपून काढले. दीबांग खोरे, लोअर दिबांग खोरे, लोहित, चांगलांग, क्रा दादी, कुरुंग, कुमेय आणि लोंगडिंग आदी भागांमध्ये मोठी हानी झाली आहे. कामेंग, सुबानसीरी, पापुम पारे आदी स्थाने पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाने निवारण कार्य हाती घेतले आहे.

त्रिपुरात सुधारणा

त्रिपुरा राज्यातील पूरपरिस्थिती निवळण्यास मंगळवारी दुपारपासून प्रारंभ झाला. आता राज्यातील सर्व मुख्य नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीच्या बरेच खाली गेले आहे. तरीही सध्या सरकारी सुरक्षागृहांमध्ये 10 हजारांहून अधिक लोक वास्तव्यास आहेत. राज्य प्रशासनाने विस्थापित लोकांसाठी अन्न आणि औषधांची सोय केली असून परिस्थिती सुधारल्यास एक दोन दिवसांमध्ये ते घरी जाऊ शकतील, अशी माहिती देण्यात आली. जूनच्या पहिल्या आठवड्यात इतका पाऊस पडण्याची ही अनेक दशकांमधील प्रथमच वेळ आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

उत्तराखंडकडून साहाय्य घोषित

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी ईशान्य भारतातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनी संपर्क केला आहे. त्यांच्याकडून त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली असून आपल्या राज्याकडून शक्य तितके साहाय्य केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यांनी मृत सैनिकांच्या नातेवाईकांना 10 लाखाचे अनुदान घोषित केले.

Advertisement
Tags :

.