For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईशान्य भारतात पूरस्थितीची भीषणता कायम

07:10 AM Jun 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
ईशान्य भारतात पूरस्थितीची भीषणता कायम
Advertisement

50 हून अधिक बळी : आसामपासून मणिपूरपर्यंत पूरसदृश परिस्थिती : मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटनांमध्ये मोठी वाढ

Advertisement

वृत्तसंस्था/गुवाहाटी

आसाम आणि ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये पुरामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. आसाम, मणिपूर, सिक्कीमसह ईशान्य भारतातील सात राज्यांमध्ये मृतांचा आकडा सुमारे 50 च्या वर पोहोचला आहे. आसाममधील पूरस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. पुरामुळे आणखी सहा जणांचा बुधवारी मृत्यू झाल्यामुळे यावर्षी आसाममधील पूर आणि भूस्खलन दुर्घटनांमधील मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी आसाम आणि सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी तसेच मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याशी ईशान्येकडील राज्यांमधील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पूर धोक्याचा सामना करण्यासाठी तसेच मदत आणि पुनर्वसन प्रयत्नांमध्ये केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

सात राज्यांमध्ये 48 मृत्यू

ईशान्येकडील राज्यांमध्ये 29 मे पासून पाऊस आणि पुरात झालेल्या 48 मृत्यूंपैकी सुमारे 17 जणांचा एकट्या आसाममध्ये मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, अरुणाचल प्रदेशात 12, मेघालयात 6, मिझोराममध्ये 5, सिक्कीममध्ये 4, त्रिपुरात 2 आणि नागालँड आणि मणिपूरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी शाळा, बाजारपेठा, वाहतूक यंत्रणा कोलमडली असून शेती-भातीची कामेही खोळंबली आहेत.

आसाम : 6.50 लाखांहून अधिक लोक प्रभावित

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, 21 जिह्यांमध्ये पूर आणि पावसामुळे साडेसहा लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. 21 जिह्यांतील 1,506 गावांमधील 14,739 हेक्टरपेक्षा जास्त शेतीवरही परिणाम झाला आहे. राज्यातील ब्रह्मपुत्रा आणि इतर सहा नद्यांनी अनेक ठिकाणी धोक्याची  पातळी ओलांडली आहे. आसाममधील एकूण सात नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. यामध्ये हैलाकांडी जिल्ह्यातील मतिजुरी येथील कटखल नदीचाही समावेश आहे.

मणिपूरमध्ये 10,477 घरांचे नुकसान

मणिपूरमध्ये आलेल्या पुरामुळे 56,000 हून अधिक लोक बाधित झाले आहेत. तसेच 10,477 घरांचे नुकसान झाले आहे. नद्यांच्या पाण्यामुळे राजधानी इम्फाळ आणि इम्फाळ पूर्व जिह्यातील अनेक भाग जलमय झाले आहेत. या भागात नदीचे पाणी शेत-शिवारांमध्ये आणि वस्त्यांमध्ये घुसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नागालँडमध्ये राष्ट्रीय महामार्ग ठप्प

नागालँडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोहिमा जिल्ह्यातील फेसामा गावात एनएच-2 चा 50 मीटरचा भाग वाहून गेला आहे. या आपत्तीमुळे नागालँड आणि मणिपूरमधील वाहतुकीच्या मुख्य मार्गाशी संपर्क तुटला आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की रविवारपासून मणिपूरला मालवाहतूक करणारे 100 हून अधिक ट्रक रस्त्यावर अडकले आहेत. पुढे जाण्याचा कोणताही पर्यायी मार्ग नसल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

मिझोराममध्ये 600 हून अधिक ठिकाणी भूस्खलन

गेल्या 100 दिवसांत एकट्या मिझोराममध्ये 600 हून अधिक भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. तथापि, त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील पूर परिस्थितीत निश्चितच सुधारणा दिसून आली आहे. मणिपूर आणि त्रिपुरामध्ये पूर संकट टाळण्यासाठी आर्मी हेडक्वार्टर ईस्टर्न कमांड अंतर्गत आसाम रायफल्स ऑपरेशन जल राहत-2 अंतर्गत मानवतावादी आणि आपत्ती मदत पोहोचवली जात आहे.

Advertisement
Tags :

.