हिंदुकुश हिमालयात वाढत्या तापमानामुळे पुराचा धोका
हवामान बदलाने वाढविली चिंता
मागील 70 वर्षांमध्ये आलेल्या पुराचे विश्लेषण केल्यावर हिंदुकुश हिमालय क्षेत्रात पुराच्या घटना सातत्याने वाढत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. केवळ पुराची संख्या वाढली नसून ती अधिक जटिल झाल्याने त्याचा पूर्वानुमान व्यक्त करणे अवघड ठरले आहे. हवामान बदल या समस्येचे मुख्य कारण असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
आशियाच्या उंच पर्वतीय क्षेत्रांमध्ये आलेल्या एक हजारांहून अधिक पुरांचे अध्ययन करण्यात आल्याचे सायन्स बुलेटिन जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनात म्हटले गेले आहे. 2000 सालानंतर पुराच्या घटनांमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. या वृद्धीमागे तापमानात होत असलेली वाढ मुख्य कारण आहे. तसेच जीवाश्म इंधन म्हणजेच कच्चे तेल, कोळसा आणि गॅसच्या वाढत्या दहनालाही जबाबदार मानले जात आहे.
पेकिंग विद्यापीठ, इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटीग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट (आयसीआयएमओडी) आणि कोलोराडो विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी 1950 पासून आतापर्यंत आशियाच्या उंच पर्वतीय क्षेत्रांमध्ये विविध प्रकाराच्या पुरांचे अध्ययन केले आहे.
अनियंत्रित निर्मितीकार्ये रोखावीत
संशोधनाशी संबंधित वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनी मान्सूनचा प्रचंड पाऊस किंवा ग्लेशियर तुटल्याने आपत्तींची एक साखळी सुरू होऊ शकते आणि यामुळे या क्षेत्रात मोठे संकट उभे राहू शकते असा इशारा दिला. नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव त्याला सामोरे जाण्यासाठी तयार नसलेल्या क्षेत्रांवर अधिक पडणार आहे. संवेदनशील खोऱ्यांमध्ये रियल टाइम पूर देखरेख प्रणाली स्थापन केली जावी. तसेच जोखिमयुक्त क्षेत्रांमध्ये अनियंत्रित निर्मितीकार्ये रोखण्यात यावीत अशी सूचना त्यांनी केली आहे.
8 देशांपर्यंत फैलावलेले आहे क्षेत्र
हिंदुकुश हिमालय क्षेत्र 8 देश भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, म्यानमार, नेपाळ आणि पाकिस्तानपर्यंत फैलावलेले आहे. ही 3500 किलोमीटर लांब पर्वतरांग असून जगाच्या सुमारे 200 कोटी लोकसंख्येसाठी जल, अन्न आणि ऊर्जेचा स्रोत आहे. हे क्षेत्र हवामान बदल, प्रदूषण आणि जैवविविधेचा ऱ्हास यासारख्या आव्हानांना सामोरे जात आहे.