अहमदाबादमध्ये पूरसदृश परिस्थिती
गुजरातसह उत्तराखंड, राजस्थान, हिमाचलमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी : घरे-कार्यालयांमध्ये पाणी
वृत्तसंस्था/अहमदाबाद
देशातील बहुतेक भागात मान्सूनने हजेरी लावली आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरातमध्ये पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये गेल्या 12 तासांपासून मुसळधार पाऊस पडल्यामुळे अहमदाबाद शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचवेळी, वडोदरामध्ये मुसळधार पावसामुळे अहमदाबाद-मुंबई महामार्गावर 15 किमीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशातील कुल्लूच्या होरानगढ गावात ढगफुटी झाल्यानंतर गुरुवारी दिवसभर मदतकार्य सुरू होते. येथे अनेक वाहने ढिगाऱ्याखाली दबली आहेत. दरम्यान, राजस्थानमध्येही मान्सूनचा पाऊस सुरू झाला असून बांसवाडा येथे एका दिवसात सर्वाधिक 8 इंच पाऊस कोसळला.
हिमाचलमध्ये 5 ठिकाणी ढगफुटीसदृश
हिमाचल प्रदेशात गेल्या 24 तासांत कुल्लू जिह्यातील जिवा नाला, शिलागड (गढसा) खोरे, स्ट्रो गॅलरी (मनाली), होरानगड (बंजर), कांगडा आणि धरमशाला येथील खानियारा येथे ढगफुटी झाली. त्यामुळे अचानक आलेल्या पुरात 9 हून अधिक लोक वाहून गेले. त्यानंतर सुरू झालेल्या बचावकार्यात 5 जणांचे मृतदेह सापडले आहेत. गुरुवारी सकाळी धरमशालाच्या खानियारा येथील एका बेपत्ता कामगाराला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याचवेळी, कुल्लूमध्ये 2 हजार पर्यटक अडकले आहेत. धरणातून पाणी सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.