खानापूर तालुक्यात धुवाधार : नदी, नाल्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ
खानापूर : तालुक्यात सोमवारी आणि मंगळवारी असे दोन दिवस पावसाने कहर केला आहे. सोमवारी सायंकाळपासून पावसाने जोरदार सुरुवात केली असून मंगळवार दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे शहरासह तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले आहे. नदी, नाल्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून शहराजवळून वाहणाऱ्या मलप्रभा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून नदीघाट पाण्याखाली गेला आहे. मुसळधार होत असलेल्या पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना बुधवार दि. 25 रोजी एक दिवसाची सुटी जाहीर केली आहे. मे महिन्याच्या मध्यावरच मान्सूनपूर्व पावसाने जोरदार झोडपले होते. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. आणि नदी, नाले मे महिन्याच्या मध्यावरच प्रवाहित झाले होते. गेल्या आठ-दहा दिवसांपासून संततधार पाऊस होत होता. मात्र सोमवारी सायंकाळपासून पाऊस मुसळधार सुरू झाला असून मंगळवारी दिवसभर मुसळधार कोसळत राहिल्याने पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. अनेक नदी, नाल्यावरील लहान पुलावर पाणी आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. खानापूर हेम्माडगा मार्गावरील मणतुर्गाजवळील हलात्री नाल्यावरही पाणी आलेले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद होणार आहे.