नायजेरियात पूरबळींचा आकडा दीडशेपार
अनेक घरे-इमारतींची हानी : सरकारकडून मदत-बचावकार्य
वृत्तसंस्था/ नायजर
नायजेरियातील नायजर राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजारपेठा, घरे आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीत 151 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी शनिवारी करण्यात आली. नायजर राज्यातील मोकवा नावाच्या बाजारपेठेतील एका शहरात भीषण पुराचा तडाखा बसल्यामुळे अनेक घरे व इमारतींची हानी झाली आहे. सरकारकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे, परंतु स्थानिक लोकांना अजूनही मदतीची नितांत आवश्यकता आहे.
नायजेरियामध्ये पावसाळ्यात अनेकदा पूर येतात. विशेषत: नायजर आणि बेन्यू नद्यांच्या काठावरील गावांना याचा मोठा फटका बसतो. आताही नायजरमधील पूरस्थितीमुळे अनेक लोक अजूनही अडकले असून बचावकार्य सुरू आहे. यापूर्वी, प्राथमिक माहितीनुसार मृतांचा आकडा 20 वर पोहोचला होता, परंतु पूरस्थिती वाढत असल्याने हा आकडा दीडशेपार पोहोचला आहे. शनिवारपर्यंत 115 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ही संख्या वाढू शकते, असे नायजर राज्याची राजधानी मिन्ना येथील आपत्कालीन कार्यालयाचे प्रमुख हुसैनी इसाह यांनी सांगितले.
संततधार सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोकवा परिसर पूर्णपणे बुडाला आहे. जवळच्या एका शहरात धरण फुटल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली. दक्षिण आणि उत्तर नायजेरियातील व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी हे शहर एक प्रमुख व्यापारी केंद्र मानले जाते. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये अशीच एका घटना घडली होती. नायजेरियाच्या ईशान्य भागातील मादुगुरी येथे मुसळधार पावसामुळे आणि धरण फुटल्यामुळे 30 जणांना प्राण गमवावे लागले होते. तसेच हजारो लोक बेघर झाले होते.