For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुजरातमध्ये गंभीर पूरसंकट

07:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुजरातमध्ये गंभीर पूरसंकट
Advertisement

रस्ते पाण्याखाली, वाहने बुडाली :  लोकांचे प्रचंड हाल : युद्धपातळीवर बचावकार्य

Advertisement

वृत्तसंस्था /जामनगर

गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे तीव्र पूरसंकट निर्माण झाले आहे. पूरामुळे अनेक जिल्ह्यांमधील जनजीवन कोलमडले आहे. पूरामुळे आतापर्यंत राज्यात 30 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर अतिवृष्टी आणि पूराचा मार झेलणाऱ्या गुजराला लवकर दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. हवामान विभागाने शुक्रवारी देखील अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा जारी केला आहे.

Advertisement

गुजरात सरकारनुसार मोरबी, वडोदरा, भरुच, जामनगर, अरावली, पंचमहल, द्वारका आणि डांग जिल्ह्यांमध्ये जीवितहानी झाली आहे. आणंद येथे 6 जणांचा मृत्यू झाला. तर अहमदाबादमध्ये पूरसंकटामुळे 4 जणांना जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर गांधीनगर, खेडा, महिसागर, दाहोद आणि सुरेंद्रनगर जिल्ह्यांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मोरबी जिल्ह्यात एक नदी ओलांडणारा ट्रॅक्टर वाहून गेल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

पूरग्रस्त भागांमधून सुमारे 18 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. हवामान विभागाने राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट तर 22 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील 18 जिल्हे पूरसंकटाला तोंड देत आहेत. पूरसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून संपर्क साधत स्थितीचा आढावा घेत शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. जामनगर उत्तरच्या भाजप आमदार रिवाबा जडेजा यांनी पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. रिवाबा यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करत बचावकार्यासाठी आवश्यक निर्देश दिले आहेत.

सैन्याकडुन बचावकार्य

हवामान विभागानुसार अहमदाबाद, वडोदरा, जूनागढ समवेत अनेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी अतिवृष्टी झाली आहे. या पार्श्वभुमीवर एनडीआरएफ, एसडीआरएफ, सैन्य, वायुदल आणि भारतीय तटरक्षक दलाने मिळून मदत तसेच बचावकार्य राबविले आहे. राजकोट, आणंद, मोरबी, खेडा, वडोदरा आणि द्वारका येथे सैन्याला तैनात करण्यात आले आहे. तर अहमदाबाद, राजकोट, बोटाद, आणंद, खेडा, महिसागर आणि मोरबीमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.