शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो!
मालवण प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा माफीनामा : पंतप्र्रधानांच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराच्या भूमिपूजन
पालघर : माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी शिवाजी महाराज फक्त नाव नाही, तर आमच्यासाठी शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. मी आज नमन करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे माफी मागितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मोदींनी राजकोट किल्ल्याबाहेर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला या घटनेबाबत पहिल्यांदाच भाष्य केले आहे.
‘आज या कार्यक्रमाची चर्चा करत असताना, मी आपल्या भावना व्यक्त करू इच्छितो, माझी पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून निवड झाली होती, त्यावेळी मी रायगडावर येऊन शिवाजी महाराज यांच्या समाधीजवळ येऊन बसलो होतो. मागच्या आठवड्यात सिंधुदुर्गामध्ये जे घडलं, ते दुर्दैवी असून माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर आमच्यासाठी शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. मी आज नमन करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो, असे त्यांनी सांगितले.
वीर सावरकरांना शिव्या दिल्या जातात
भारताचे महान सुपुत्र वीर सावरकरांना त्यांच्याकडून शिव्या दिल्या जातात. अपमानित केले जाते. देशभक्तांच्या भावनांचा चुराडा केला जातो. वारंवार वीर सावरकरांचा अपमान करूनही त्यांच्याकडून माफी मागण्यात येत नाही. उलट ते कोर्टात जातात, पण त्यांना पश्चात्ताप होत नाही. हे त्यांचे संस्कार आहेत. परंतु आमचे संस्कार वेगळे आहेत. महाराष्ट्राच्या या भूमीत शिवाजी महाराजांच्या चरणावर डोके टेकवून माफी मागत आहे. जे लोक शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतात त्यांच्या काळजाला ठेच लागली आहे. या आराध्य दैवतेचे पूजा करणाऱ्यांची मी माफी मागतो. आमच्यासाठी आराध्य दैवतेपेक्षा काहीच मोठे नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे सागरी ताकदीला वेगळी ओळख
मच्छीमार बांधवांसाठी आज 700 कोटीहून अधिक योजनांचा शुभारंभ केला आहे. तसेच वाढवण बंदर, दिघी बंदर औद्योगिक क्षेत्र, विविध मत्स्य व्यवसायाच्या योजनांचा शुभारंभ ही मोठमोठी कामे माता महालक्ष्मी, माता जिजाऊ, माता जीवदानी व भगवान तुंगारेश्वर यांच्या आशिर्वादाने होत आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
जगातील सर्वात मोठे बंदर होणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पालघर येथील वाढवण बंदरात देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठे कंटेनर बंदर होणार आहे. या पोर्टवर 76 हजार कोटींहून अधिक जास्त रक्कम खर्च करणार आहोत. हे देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असणार आहे. आज देशातील सर्व कंटेनर बंदरातून जेवढ्या कंटेनरची चढ-उतार होईल, त्याच्यापेक्षा जास्त कंटेनरचे काम एकट्या वाढवण बंदरात होणार आहे. हे पोर्ट महाराष्ट्र आणि देशाच्या व्यापाराच्या औद्योगिक प्रगतीचे किती मोठे पेंद्र होईल, याची कल्पना करा, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय बंदर विकास, जहाज व जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन राज्यमंत्री जॉर्ज कुरियन, केंद्रीय बंदर विकास, जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पालघरमधील वाढवण बंदराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मोदींनी आपल्या भाषणातून वाढवण बंदराचे महत्त्व सांगतानाच विरोधकांवरही निशाणा साधला. गेल्या 60 वर्षांमध्ये वाढवण बंदराचा विकास होणे अपेक्षित होते, मात्र तो झाला नाही. वाढवणच्या आणि महाराष्ट्राच्या विकासकामाला विरोधकांमुळे ब्रेक लागला असा आरोप यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
प्रत्यक्ष 12 लाख रोजगार
वाढवण बंदर प्रकल्पाने या ठिकाणी अनेक लाख कोटींची गुंतवणूक येणार आहे. 12 लाख रोजगार येणार आहेत. या विकासाला कोणाचा विरोध होता. महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावणारे हे कोण लोक होते? राज्यातील तऊणांना रोजगार मिळण्यास कोणाचा आक्षेप होता? आधीच्या सरकारने हे काम पुढे का नाही नेले? ही गोष्ट राज्यातील लोकांनी कधीच विसरू नये. खरे तर काही लोकांना महाराष्ट्राला मागास ठेवायचे आहे, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. पण आमच्या महायुतीच्या आणि एनडीएच्या सरकारला राज्याला देशात सर्वात पुढे न्यायचे आहे, असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सांगण्यात आले.
भारताचा यूपीआय संपूर्ण जगात उत्तम उदाहरण
कधीकाळी लोक म्हणायचे की कॅश इज किंग, पण आज जगातील रिअल टाइम डिजिटल व्यवहारांपैकी निम्मे व्यवहार भारतात होत आहेत. त्यामुळे भारताचा यूपीआय हा जगभरातील फिनटेकचे उत्तम उदाहरण बनले असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला. पालघरला जाण्यापूर्वी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ’ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024‘ च्या विशेष सत्राला संबोधित करताना मोदींनी भारताचा यूपीआय संपूर्ण जगात फिनटेकचे एक मोठे उदाहरण बनले असल्याचे मोठे वक्तव्य केले.
बंदराची वैशिष्ट्यो
- वाढवण बंदर प्रकल्पासाठी 76,200 कोटी रुपये खर्च येणार आहे.
- पश्चिम किनाऱ्यावर स्थित वाढवण बंदर आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांना थेट कनेक्टिव्हिटी निर्माण करेल आणि पारगमन वेळ आणि खर्च कमी करेल.
- या बंदराच्या उभारणीमुळे अमृतकाल दरम्यान भारताच्या व्यापक आर्थिक उद्दिष्टांशी जुळवून घेऊन रोजगाराच्या लक्षणीय संधी निर्माण होणार आहेत.
- या प्रकल्पामुळे सुमारे 10 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे.