मध्यवर्ती बसस्थानकात नव्या बसेसचा ताफा दाखल
बेळगाव : बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकाच्या ताफ्यात नव्या बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस बसस्थानकातून उपनगरासह ग्रामीण भागात धावणार आहेत. जुन्या झालेल्या बसेस स्क्रॅपमध्ये घालून नव्या बसेस दाखल करून घेण्यात आल्या आहेत. याचा प्रवाशांना लाभ होणार असून, अत्याधुनिक सुविधेचाही अनुभव घेता येणार आहे. या बसेस राज्यनगर वाहतूक निधीतून तयार करण्यात आल्या आहेत. यापूर्वी अपुऱ्या बससेवेचा नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही फटका बसत होता. काहीवेळा तर प्रवाशांना तासन्तास बसच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबावे लागत होते. बसेस नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आसरा घेऊन घर गाठावे लागत होते.
बहुतांशवेळा विद्यार्थी बसच्या पायऱ्यांवर थांबून जीवघेणा प्रवास करत असल्याचे दिसून आले. यामुळे प्रवाशांसह विद्यार्थीवर्गांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तर अनेकवेळा बसफेऱ्या वाढविण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनही करण्यात आले. मध्यवर्ती बसस्थानकात अनेक वर्षांपासून सेवा बजावत असलेल्या बसेस स्क्रॅपमध्ये घालण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी नव्या बसेसचा ताफा दाखल करण्यात आला असून, सार्वजनिकांच्या सेवेसाठी विविध मार्गांवर बसेस धावत आहेत. बसेसमध्ये सुसज्ज आसन व्यवस्था असून, अत्याधुनिक सेवाही प्रदान करण्यात आली आहे. नव्या बसेसमुळे काहीप्रमाणात अपुऱ्या बससेवेची समस्या निकाली निघणार आहे. याचा प्रवाशांसह विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.