स्टेट कंझ्युमर कमिशन कार्यालयाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित करा
वकिलांची पालकमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगावच्या तक्रारदारांना ग्राहक न्यायालयाच्या संदर्भात तक्रारींसाठी यापूर्वी बेंगळूर गाठावे लागत होते. नागरिकांच्या मागणीनुसार बेळगावमध्ये स्टेट कंझ्युमर कमिशन कार्यालय मंजूर झाल्याने आता तक्रारदारांची धावपळ थांबणार आहे. परंतु अद्याप या कार्यालयाचे उद्घाटन झाले नसल्याने तारीख निश्चित करून कार्यालयाचे उद्घाटन करावे, अशी मागणी वकिलांच्यावतीने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ऑटोनगर येथील के. एच. सभागृहात स्टेट कंझ्युमर कमिशन कार्यालयासाठी जागा निश्चित करण्यात आली. बेळगावसह धारवाड, कारवार, विजापूर, बागलकोट, उडुपी या जिल्ह्यातील तक्रारदारांना ग्राहक न्यायालयाशी संबंधित व्यवहार याठिकाणी करता येणार आहेत. गुलबर्गा येथील कार्यालय सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप बेळगावमधील कार्यालय सुरू झालेले नाही. त्यामुळे तारीख निश्चित करून कार्यालयाचे उद्घाटन करण्याची मागणी वकिलांनी पालकमंत्र्यांना केली. यावेळी अॅड. एन. आर. लातूर, केंपण्णा यादगुडे, विनोद पाटील, रोहित लातूर, शितल बिलावर, काजल नाईक, कीर्ती कांबळे, यशवंत लमाणी यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.