For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विष घालून पाच वाघांची हत्या

06:30 AM Jul 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
विष घालून पाच वाघांची हत्या
Advertisement

सध्या कर्नाटक राज्यातील चामराजनगर येथील माले महादेवेश्वर पर्वतराजीत वसलेल्या अभयारण्याच्या गजानूर परिसरात 26 जून रोजी एक प्रौढ वाघीण आणि चार बछड्यांची विष घालून हत्या करण्याची दुर्घटना प्रकाशात आली. आपल्या गायीची हत्या केल्याने, संबंधित कुटुंबातल्या तिघाजणांना वन खात्याने विषबाधेसाठी जबाबदार धरून शिताफीने अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची रितसर चौकशी करून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यासाठी कर्नाटक राज्याचे वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खांड्रे यांनी चौकशी समिती स्थापन केलेली आहे. चामराजनगर येथील एकाच दिवशी चक्क पाच वाघांची विष घालून हत्या करण्यात आल्याने या प्रकरणाने कर्नाटक हादरला आहे.

Advertisement

माले महादेश्वर अभयारण्य कर्नाटक राज्यातल्या चामराजनगर परिसराच्या निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असल्याकारणाने त्याची रितसर अधिसूचना 2013 साली काढण्यात आली. 2017 साली केंद्रीय वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने त्याच्या भोवतालच्या जंगलाला पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्र अधिसूचित केले. या अभयारण्यात पट्टेरी वाघांबरोबर अन्य प्राणीसंपदा असल्याने त्याला ‘व्याघ्र राखीव क्षेत्र’ म्हणून अधिसूचित करण्याचा प्रस्ताव कर्नाटक वन खात्याने तयार केला परंतु व्याघ्र राखीव क्षेत्राचा हा प्रस्ताव विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटक राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत 2022 साली जेव्हा चर्चेला आता तेव्हा तो त्यांनी पुढे ढकलला.

सदर अभयारण्याच्या क्षेत्रात आणि परिसरात वास्तव्यास असणाऱ्या पशुपालक आणि अन्य लोकसमूहाचे पुनर्वसन कळीचा मुद्दा ठरलेला आहे. अभयारण्यात पाळीव जनावरे चरण्यासाठी नेल्यावर त्यांच्यावर पट्टेरी वाघाकडून होणारे हल्ले रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना त्वरित करण्यात वन खात्याने दिरंगाई केली आणि त्यामुळे वाघ आणि मानव यांच्यातला संघर्ष विकोपाला पोहोचलेला होता. तृणहारी जंगली श्वापदांच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या शिकारीमुळे पट्टेरी वाघांसाठी रानात सहज चरताना भेटणारी पाळीव जनावरे उपयुक्त ठरलेली आहे. जंगली श्वापदांची शिकार रोखण्यासाठी वनखात्याने शिकार प्रतिबंध पथक स्थापन केले होते परंतु एप्रिल 2025 मध्ये दैनंदिन रोजंदारीवर असणाऱ्यांना जूनपर्यंत पगार दिला नसल्याने शिकार प्रतिबंध पथक दुर्बल झाले होते. त्यामुळे कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाच्या अभावाची समस्या अभयारण्य व्यवस्थापनासमोर आव्हान बनली होती. जेव्हा 2014 साली पट्टेरी वाघिणीचे अस्तित्व कॅमेरा ट्रॅपद्वारे इथे असल्याचे स्पष्ट झाले होते, तेव्हापासून खरेतर व्याघ्र संवर्धन आणि संरक्षणासाठी  विशेष लक्ष देणे गरजेचे होते.

Advertisement

मांसासाठी बछड्यासह फिरणारी वाघीण अभयारण्य क्षेत्रात वावरत असल्याने, तिच्यामार्फत पाळीव जनावरांची शिकार होणार असल्याची शक्यता असल्याकारणाने वन्यजीव विभागाने विशेष दक्षता ठेवणे गरजेचे होते. खरेतर जेव्हा वाघिणीने गाय ठार केली, त्यावेळी त्वरित संबंधित कुटुंबाला योग्य नुकसान भरपाई देण्यासाठी दिरंगाई झाल्याने, ठार करण्यात आलेल्या गाईच्या मृत कलेवरावर जहरी विष मिसळण्यात आले आणि हे मांस वाघीण तसेच बछड्याने खाल्ल्याने त्यांचा मृत्यू उद्भवला.

एक वाघीण आणि चार बछड्यांनी विषयुक्त मांस भक्षण केल्याने त्यांना मृत्यू आल्याची दुर्घटना घडल्यानंतर तीन दिवसानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन वनमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. या दुर्घटनेला वन खात्याचा बेफिकीरपणा उघडकीस आल्याने सरकारने संबंधित उप वनसंरक्षक आणि दोन क्षेत्रिय वनाधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित केलेले आहे. एकाचवेळी विषप्रयोगाने पाच वाघांचा करुण मृत्यू उद्भवण्याची ही दुर्घटना कर्नाटकात पहिल्यांदाच उद्भवलेली आहे. अशाच प्रकारची दुर्घटना 2020 साली कर्नाटक राज्याशी संलग्न असलेल्या गोव्यात सत्तरीतल्या गोळावलीत एकाचवेळी विषयुक्त पाळीव जनावराचे मांस भक्षण केल्याने उद्भवली होती. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या संशयितांना अटकही करण्यात आली होती. परंतु त्यानंतर पुढे आजतागायत हे प्रकरण न्यायालयासमोर सुनावणीला आलेले नाही. गोव्यानंतर अशाच व्याघ्र हत्येची पुनरावृत्ती चामराजनगरातल्या अभयारण्यात उद्भवलेली आहे, ही धक्कादायक बाब आहे.

2020 ते जून 2025 या कालखंडात देशभर 662 वाघांना अकाली मृत्यू आलेला असून त्यातल्या 82 वाघांचा मृत्यू गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात कर्नाटक राज्यात झालेला आहे, ही चिंतेची बाब आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या व्याघ्र गणनेनुसार कर्नाटक राज्य व्याघ्र संवर्धन आणि संरक्षणात देशभरात द्वितीय क्रमांकावर असून, इथल्या जंगलात 563 वाघांची नोंद झालेली आहे. वाघाने ठार केलेल्या पाळीव जनावराच्या कलेवरावर विष टाकल्याने ते मांस खाल्ल्यावर यापूर्वीही कर्नाटकात वाघांचे मृत्यू झालेले आहेत. 2019 साली ठार केलेल्या रानडुक्कराच्या कलेवरावरती विष मिश्रीत केल्याने असे मांस खाल्ल्याने नागरहोळे येथे एका वाघाचा मृत्यू झाला होता. 2021 साली काळी व्याघ्र राखीव क्षेत्रात तर 2023 साली बंदीपुरात विषमिश्रीत मांस खाऊन पट्टेरी वाघांचे मृत्यू झालेले होते.

महाराष्ट्रातले नागपूर शहर देशभर वाघांची राजधानी म्हणून ओळखत असले तरी चंद्रपूर परिसरात मानव आणि पट्टेरी वाघ यांच्यातला संघर्ष विकोपाला पोहोचलेला आहे. चामराजनगर येथील पाच वाघांचे विष प्रयोगाने झालेले मृत्यू मानव आणि पट्टेरी वाघ यांच्यातला संघर्ष विकोपाला पोहोचल्याचे स्पष्ट करत आहे. एकेकाळी मानवी समाजाने पट्टेरी वाघांशी असलेले सौहार्दाचे संबंध आत्मकेंद्रित विकासाने बिघडविलेले आहे आणि त्यामुळे वाघावरती विषप्रयोग करण्याची मजल जंगल निवासी लोकसमूहाने गाठलेली ही बाब चिंताजनक आहे.

राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :

.