आशिया कप संघ निवडीवेळी पाच खेळाडूंकडे दुर्लक्ष
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताकडून आशिया कपसाठी संघाची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करूनही अनेक खेळाडूंना संघात स्थान मिळू शकलेले नाही. आयपीएलच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम हंगामाचा आनंद घेणारा श्रेयस अय्यर, सलामीचा स्फोटक फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि सर्व फॉरमॅटमध्ये सातत्य राखणाऱ्या केएल राहुल यांना संघातून आश्चर्यकारक वगळण्यात आले आहे. याचबरोबर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरची आणि इंग्लंडच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी मिळविणाऱ्या मोहम्मद सिराजलाही संघातून डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे या खेळाडूंची संघात निवड करण्यात न आल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे.

- श्रेयस अय्यर
आशिया चषकासाठी संघातून श्रेयसला वगळणे धक्कादायक आहे. कारण त्याने निवडीची मागणी करण्यासाठी खेळाडू जे काही करू शकतो ते सर्व केले आहे. 30 वषीय या फलंदाजाने आयपीएल 2025 च्या 17 डावांमध्ये 50.33 च्या सरासरीने आणि 175.07 च्या स्ट्राईक रेटने 604 धावा केल्या आहे. त्याने सहा अर्धशतके झळकवली असून 2014 नंतर पंजाब किंग्जला पहिल्यांदाच अंतिम फेरीत घेऊन गेले होते. या वर्षाच्या सुऊवातीला, तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयात भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने पाच डावांमध्ये 48.60 च्या सरासरीने 243 धावा केल्या असून दोन अर्धशतकांचा समावेश होता. अशी उत्कृष्ट कामगिरी करूनही त्याला संघात जागा मिळालेली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
- यशस्वी जैस्वाल

आशिया कप संघातून जैस्वालची अनुपस्थिती ही एक आश्चर्याची बाब आहे. विशेषत: अशा फलंदाजासाठी त्याला सलामीच्या क्रमांकावर आपले स्थान पक्के करायचे होते. गेल्यावषी टी-20 विश्वचषक विजेत्या संघात जरी तो राखीव सलामीवीर असला तरी 2025 च्या आयपीएल सिझनमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याने 14 सामन्यांमध्ये 43.00 च्या सरासरीने आणि 159.71 च्या स्ट्राईक रेटने 559 धावा काढत राजस्थान रॉयल्सचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून कामगिरी केली. मात्र, जैस्वालच्या निवडीकडे दुर्लक्ष करून निवडकर्त्यांनी अभिषेक शर्माला संघात स्थान दिले आहे.
- के. एल. राहुल
के. एल. राहुल या उल्लेखनीय खेळाडूला संघात स्थान न दिल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. 2022 च्या विश्वचषकादरम्यान शेवटचा टी-20 सामना खेळणारा यष्टीरक्षक-फलंदाज तसेच सर्व स्पर्धांमध्ये चांगला फॉर्म असूनही सर्वात लहान फॉरमॅटमध्ये लोकप्रियता गमावत आहे. राहुलने दिल्ली पॅपिटल्ससोबत 2025 च्या आयपीएल मोहिमेचा आनंद घेतला. 53.9 च्या सरासरीने आणि 150 च्या स्ट्राईक रेटने 539 धावा केल्या आहेत. याचबरोबर इंग्लंडविऊद्धच्या हाय-प्रोफाइल मालिकेत त्याने तोच फॉर्म कसोटी क्षेत्रातही कायम ठेवला. राहुल भारताचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 10 डावात दोन शतके आणि तीन अर्धशतकांसह 532 धावा केल्या होत्या. परंतु राहुल यालाही संघात स्थान मिळू शकलेले नाही.
- वॉशिंग्टन सुंदर
अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संघातून वगळणे ही आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. त्याच्या ऑफ-स्पिन आणि खालच्या फळीतील फलंदाजीमुळे एक मौल्यवान पर्याय म्हणून पाहिले जाणाऱ्या या अष्टपैलू खेळाडूने इंग्लंडविऊद्धच्या कसोटी मालिकेत प्रभाव पाडला होता. यामुळे त्याला वगळणे अधिक अनपेक्षित झाले. ही स्पर्धा फिरकीपटूंना अनुकूल असलेल्या यूएईच्या परिस्थितीत खेळवण्यात येणार असल्याने त्याच्या बहुमुखी प्रतिभेमुळे संघात संतुलन निर्माण होऊ शकले असते. तथापि, निवडकर्त्यांनी कुलदीप यादवचा मनगट-फिरकी गोलंदाज, वऊण चक्रवर्तीचा गूढ आणि अक्षर पटेलचा अनुभव पसंत करून विविधतेवर भर दिला आहे.
- मोहम्मद सिराज
इंग्लंडमध्ये मालिका अनिर्णित राखण्यात यशस्वी झालेल्या गोलंदाज मोहम्मद सिराजला वगळणे ही धक्कादायक गोष्ट आहे. या आक्रमक वेगवान गोलंदाजाने शेवटच्या कसोटीत सामना जिंकण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. त्याने या मालिकेत सर्वाधिक 23 बळी मिळविले होते. याचबरोबर आयपीएलच्या यंदाच्या हंगामात उत्कृष्ट गोलंदाजी करत 16 बळी टिपले आहे. तसेच सिराजने मागील आशिया चषकाच्या फायनल सामन्यात श्रीलंकेच्या फलंजादांची दैना उडविली होती. पण यंदाच्या आशिया चषकातून त्याला वगळण्यात आले आहे.