भारत-पाक संघर्षात पाच विमाने पडली
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवल्याचा दावा केला. तसेच त्यांनी या संघर्षात पाच विमाने पडल्याचेही म्हटले आहे. तथापि, त्यांनी कोणत्या देशाची विमाने पडली हे स्पष्ट केले नाही. व्हाईट हाऊसमध्ये रिपब्लिकन खासदारांसमवेत बोलताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत 24 वेळा भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीबद्दल भाष्य केले आहे. पहिल्यांदाच त्यांनी 10 मे रोजी सोशल मीडियावर पाकिस्तान-भारत लढाईत 5 विमाने पाडल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर भारताने काही पाकिस्तानी विमाने पाडल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, पाकिस्तानने त्यांच्या कोणत्याही विमानांचे नुकसान झाल्याचे नाकारताना हवाई तळांना लक्ष्य केल्याचे कबूल केले होते.
यापूर्वी 14 जुलै रोजी, ट्रम्प यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अलिकडच्या भारत-पाकिस्तान संघर्ष वाढण्यापासून रोखल्यासंबंधीच्या दाव्याचा पुनरुच्चार केला होता. ट्रम्प यांनी नाटोचे सरचिटणीस मार्क रूट यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान या टिप्पण्या केल्या. ‘युद्ध सोडवण्यात आम्ही खूप यशस्वी झालो आहोत’, असे ट्रम्प म्हणाले होते.