पाच गावठी पिस्तूल, सहा काडतुसे जप्त
विजापूर पोलिसांची बेकायदा शस्त्रांविरुद्ध मोहीम सुरूच : तिघा जणांना अटक, जिल्हा पोलीसप्रमुखांनी दिली माहिती
बेळगाव : विजापूर पोलिसांनी बेकायदा शस्त्रs जप्त करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. पंधरवड्यापूर्वी मोठ्या प्रमाणात गावठी पिस्तूल जप्त करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा पाच गावठी पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शंकर मारिहाळ, रामनगौडा हट्टी, पोलीस उपअधीक्षक बसवराज यलिगार आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गोलघुमट पोलीस स्थानकाचे निरीक्षक मल्लय्या मठपती व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी शुक्रवारी पत्रकारांना या कारवाईची माहिती दिली.
नईम शिराज शामण्णावर, मूळचा राहणार अहिरसंग, ता. इंडी, सध्या रा. हवेली गल्ली, विजापूर याला अटक करून 12 मार्च रोजी त्याच्याजवळून 1 कंट्री पिस्तूल व 1 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून निहाल ऊर्फ नेहाल मेहबूबसाब तांबोळी, रा. भवानीनगर, विजापूर याला अटक करून त्याच्याजवळून 3 कंट्री पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सिद्धू ऊर्फ सिद्ध्या गुरुपाद मुडलगी ऊर्फ मोडंगी, रा. योगापूर कॉलनी, विजापूर याला अटक करून त्याच्याजवळून 1 कंट्री पिस्तूल व 1 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. एपीएमसीचे पोलीस उपनिरीक्षक ज्योती खोत व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून एकूण तिघा जणांना अटक करून 5 गावठी पिस्तूल व 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.