ट्रॅक्टर टिलर चोरीप्रकरणी पाच जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
बैलहोंगल पोलिसांची कारवाई : 14 लाखाचा ऐवज जप्त, पोलीस प्रमुखांकडून पोलिसांचे कौतुक
वार्ताहर/बाळेकुंद्री
ट्रॅक्टर टिलरची चोरी करणाऱ्या पाच संशयित आरोपींना गुरुवारी बैलहोंगल पोलिसांनी अटक केली. गोकाक तालुक्यातील निलगंटी गावचा बसप्पा सत्यप तळवार (वय 27), आडव्याप्पा लक्ष्मण सिंतमणी (वय 28), राजू शटप्पा नायक (वय 26), सिद्धाप्पा शिवाप्पा चिकोपदवर (वय 22) व परसप्पा बसप्पा कळली (वय 21) अशी अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून अंदाजे 14 लाख रु. किमतीची ट्रॅक्टर टेलर, एक ट्रॅक्टर इंजिन, एक रुटर व इतर ट्रॅक्टरचे साहित्य बैलहोंगल पोलिसांनी जप्त केले आहे.
याबाबतची माहिती अशी की, सदर चोरट्यांनी बैलहोंगल तालुक्यातील होळीहोसूर, नेगीनहाळ गावच्या रस्त्यावर उभ्या केलेल्या ट्रॅक्टर टिलरची चोरी केली होती. याबाबत संबंधित ट्रॅक्टर मालकाने बैलहोंगल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. चोरीच्या तपासासाठी बेळगावचे पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीसप्रमुख श्रुती के., आर. बी. बसर्गी, डीवायएसपी डॉ. वीरया हिरेमठ, सीपीआय प्रमोद यलीगार व शिवानंद गुडगनट्टी यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आले होते. पीएसआय पी. एस. मोरनाळ, गुरुराज कलबुर्गी, इराप्पा रीती, प्रवीण कोटी, बीबी हुलकुंद, शंकर मेंसिनकाय, जी. आर. मळगली, सचिन पाटील. विनोद ठक्कनवर यांनी शिताफीने चोरट्यांना पकडण्यात यश मिळवले. बेळगावचे पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी बैलहोंगल पोलिसांचे अभिनंदन केले आहे. बैलहोंगल पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.