सेवाकरी हत्येप्रकरणी पाच जणांना अटक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील कालकाजी मंदिरात सेवाकरी योगेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. गलकाबाद येथील रहिवासी मोहन उर्फ भूरा (19) आणि कुलदीप बिधुरी (20) अनिल कुमार (55) आणि त्याचा मुलगा नितीन पांडे (26) या चार जणांना रविवारी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरुवातीला शनिवारी दक्षिणपुरी येथील रहिवासी आणि मूळचे गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील अतुल पांडे यांना अटक करण्यात आली होती.
कालकाजी मंदिरात 29 ऑगस्ट रोजी रात्री प्रसादावरून झालेल्या वादानंतर योगेंद्र सिंह यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोरांनी त्यांना जमिनीवर पाडून हल्ला केल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत संशयितांचा शोध सुरू केला होता. सेवेकऱ्याच्या हत्येप्रकरणी आम आदमी पक्षाने दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आप नेत्या आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी शनिवारी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.