वेंगुर्ले आगाराच्या ताफ्यात पाच नव्या बसेस दाखल
वेंगुर्ले । वार्ताहर
वेंगुर्ले आगाराला प्राप्त झालेल्या नव्या कोऱ्या पाच एसटी बसेसचा शुभारंभ आगार व्यवस्थापक राहुल कुंभार आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी करण्यात आला. आगारातील एसटी बसेस जुन्या झाल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एसटी पाठविताना नियंत्रकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे आगाराला नवीन बसेस मिळाव्यात अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या एसटी कामगार सेनेतर्फे मातोंडचे सुपुत्र असलेले माहीम मतदारसंघाचे आमदार महेश सावंत यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार महिनाभरातच वेंगुर्ले आगाराला नव्या कोऱ्या पाच एसटी बसेस मिळवून देऊन आमदार महेश सावंत यांनी आपला शब्द पाळला आहे. आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांच्या उपस्थितीत ठाकरे सेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष तथा उपजिल्हाप्रमुख संदेश निकम, माजी शहरप्रमुख अजित राऊळ, तालुका युवासेना अधिकारी पंकज शिरसाट , ठाकरे सेना एसटी कामगार जिल्हाध्यक्ष अनुप नाईक, चंद्रकांत कासार , शैलेश परुळेकर ,संदीप केळजी, गजानन गोलतकर, सुजित चमणकर, संदीप पेडणेकर मकरंद गोंधळेकर, दिलीप राणे ,अशोक धुरी ,प्रशांत बुगडे ,रोहन मल्हार ,आर्यन राऊळ आदी उपस्थित होते. दरम्यान, आपला शब्द महिन्याभरातच पूर्ण करणाऱ्या आमदार महेश सावंत यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत असे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे सेना प्रमुख रुपेश राऊळ यावेळी म्हणाले.