राज्यात आणखी पाच दिवस मुसळधार पाऊस
हवामान खात्याचा इशारा : किनारपट्टीसह मलनाड भागात अतिवृष्टी
प्रतिनिधी/ बेंगळूर
वातावरणातील बदलामुळे राज्यात मान्सूनने जोर धरला असून आणखी पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. वातावरणातील अशा प्रकारच्या बदलामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले. किनारपट्टी आणि मलनाड भागात मुसळधार पाऊस सुरूच राहणार आहे. उत्तर आणि दक्षिणेकडील भागातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे किनारपट्टी आणि मलनाड भागात अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी भूस्खलन, घरे, रस्ते आणि वीज खांबांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे कावेरी, कपिला, हेमावती, नेत्रावती, कृष्णा, तुंगभद्रा आदी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कावेरी आणि कृष्णा नद्यांनी धोक्मयाची पातळी ओलांडली असून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असल्याने नद्यांमधील पाण्याचे प्रमाणही वाढणार आहे.
जलविद्युत निर्मितीसाठी असलेले जलाशय वगळता राज्यातील उर्वरित प्रमुख जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. पुरेशी आवक असल्याने कृष्णा आणि कावेरी जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात अतिवृष्टीसह पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्याच्या किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आठवड्याच्या शेवटी पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे.
उत्तरेकडील अंतर्गत जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची चिन्हे आहेत. किनारपट्टीसह दक्षिणेकडील भागात जोरदार वारे वाहणार आहेत. तसेच ढगाळ वातावरण असून हलका ते मध्यम पाऊस राहील. कर्नाटक नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राने काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्य संकटात सापडले आहे.