‘इंडिया’शी वाटाघाटींसाठी पाच जणांची स्वतंत्र समिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसने आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘इंडिया’ आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांसह जागावाटप व्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी पाच सदस्यीय राष्ट्रीय आघाडी समिती स्थापन केली होती. मोहन प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असेल. याशिवाय अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल या दोन माजी मुख्यमंत्र्यांचाही पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद आणि मुकुल वासनिक यांनाही पाच सदस्यीय समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. 2024 च्या संसदीय निवडणुकीसाठी ‘इंडिया’मधील मित्रपक्षांची जागांविषयी वाटाघाटी करणे हा समितीचा मुख्य उद्देश आहे.
राष्ट्रीय आघाडी समितीने जागावाटपापूर्वी विविध राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पक्षाच्या स्थापना दिनी म्हणजेच 28 डिसेंबर रोजी होणाऱ्या नागपूर मेळाव्यानंतर राष्ट्रीय आघाडी समिती राज्य घटकांकडून अभिप्राय घेणार आहे. एवढेच नाही तर राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ही समिती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मित्रपक्षांशी जागावाटपावर अंतिम चर्चा करणार आहे.