शिरसी तालुक्यात भीषण अपघातात पाच ठार
कार-केएसआरटीसी बस दरम्यान दुर्घटना : बसचालक गंभीर जखमी
कारवार : कार आणि केएसआरटीसी बस दरम्यान झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाचजण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी शिरसी तालुक्यातील बंडल येथे घडली. या अपघातात बसचालक गंभीर जखमी झाला आहे. तथापि त्याच्या जीवावरील धोका टळला आहे. बसमध्ये सुमारे 60 प्रवाशी होते. यापैकी काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. कारमधील पाच मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. रामकृष्ण बाबुराव (वय 71), विद्यालक्ष्मी रामकृष्ण (वय 65), पुष्पा मोहन राव (वय 62), सुहास गणेश राव (वय 62), रा. सर्वजण पुत्तुर जिल्हा दक्षिण कन्नड आणि कारचालक अरविंद (वय 30 रा. चेन्नई) अशी मृतांची नावे आहेत. या अपघाताबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, पुत्तूर जिल्हा येथील पाचजण शिरसी येथील राघवेंद्र कल्याण मंडपात होणाऱ्या विवाह सोहळ्याला हजर राहण्यासाठी मारुती स्विफ्ट कारमधून कुमठाहून शिरसीकडे निघाले होते. त्यावेळी शिरसी तालुक्यातील बंडल येथे शिरसीहून कुमठाकडे निघालेल्या केएसआरटीसी बस आणि कार दरम्यान भीषण अपघात झाला आणि कारचालकासह पाच व्यक्ती जागीच ठार झाल्या. अपघाताचे दृष्य इतके भयानक होते की, कारचा चेंदामेंदा झाला तर बसच्या दर्शनी भागाची हानी झाली. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. शिरसी ग्रामीण पोलीस अपघातस्थळी भेट देऊन अधिक तपास करीत आहेत.