हुबळी-धारवाडमधील अपघातात पाच ठार
प्रतिनिधी/ बेंगळूर
हुबळी आणि धारवाडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जण ठार झाले असून दोघे जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे ही घटना घडली आहे. हुबळी शहराबाहेरील पुणे-बेंगळूर महामार्गावरील धारावती हनुमंत मंदिराजवळ दुचाकी आणि टवेरा कारमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. शिवराज आणि गदीगेप्पा (दोघेही रा. कुंभार गल्ली, कुंदगोळ) अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळी हुबळी उत्तर वाहतूक पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.
धारवाडच्या संपिगेनगरजवळ ट्रक आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात आठ वर्षाच्या बालकासह तिघेजण जागीच ठार झाले तर दोघेजण जखमी झाले आहेत. प्रणय हंचिनमनी (वय 8), अमरव्वा हंचिनमनी (वय 60) आणि रमेश हंचिनमनी (वय 40) अशी मृतांचे नावे आहेत. रेणुका आणि पृथ्वी अशी जखमींची नावे असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण धारवाडच्या केलगेरी येथील रहिवासी आहेत. धारवाड वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद धारवाड वाहतूक पोलीस स्थानकात झाली आहे.