शिक्षिकेसह पाच मैत्रिणींची गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक
सातारा :
शहरातील महिला शिक्षकेसह तिच्या पाच मैत्रिणींना बजाज व एचडीएफसी फायनान्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देतो, असे आमिष दाखवून विश्वासात घेत एका व्यक्तीने 22 लाख 50 हजार रूपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शिक्षिका संगिता चंद्रकांत हेंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून योगेश मदन धोंगडी (रा. शनिवार पेठ सातारा) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात संगिता हेंद्रे यांची ओळख योगेश धोंगडी यांच्याशी झाली. त्याने संगिता हेंद्रे यांना बजाज व एचडीएफसी फायनान्समध्ये काम करतो असे भासवून गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. या गुंतवणूकीवर चांगला परतावा देतो असे सांगुन विश्वासात घेतले. संगिता हेंद्रे यांनी वेळोवेळी 9 लाख रूपयांची गुंतवणूक केली. नंतर त्यांच्या मैत्रिणी श्वेता हरी जाधव यांनीही 3 लाख रुपये गुंतवले. आसावरी हेमंत रानडे यांनी 2 लाख, वर्षा शशिकांत चिंचणे यांनी 4 लाख 50 हजार, निलम सुनिल नेसे यांनी 3 लाख रूपये असे सहा जणींनी मिळून 22 लाख 50 हजार रूपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर त्यांना परतावा मिळाला नाही. यामुळे त्यांनी पैसे परत मागितले. मात्र ते देण्यास योगेश हे टाळाटाळ करू लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे सर्वाच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी योगेश विरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.