For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाच क्रिकेटपटूंचा रणजी क्रिकेटला निरोप

06:19 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाच क्रिकेटपटूंचा रणजी क्रिकेटला निरोप
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सध्या देशामध्ये 2024 चा रणजी क्रिकेट हंगाम सुरू आहे. दरम्यान विविध राज्यांच्या संघातील पाच क्रिकेटपटूंनी रणजी क्रिकेटला निरोप देण्याची घोषणा केली आहे. बंगालचा अनुभवी मनोज तिवारी, झारखंडचे सौरभ तिवारी आणि वरुण अॅरॉन, मुंबईचा धवल कुलकर्णी आणि विदर्भचा रणजी चषक विजेत्या संघाचा कर्णधार फैज फझल यांनी देशी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या क्रिकेटपटूंच्या निवृत्तीची विविध कारणे दिली गेली आहेत.

देशी क्रिकेटमधून निवृत्त होणाऱ्या या क्रिकेटपटूंनी आपल्या निवृत्तीच्या निर्णयाची विविध कारणे दिली आहेत. आयपीएल करार किंवा राष्ट्रीय संघात समावेश होण्याबाबत दिरंगाई तसेच यापैकी काही जणांनी राजकारणावर लक्ष केंद्रीत करण्याचे कारण पुढे केले आहे. वरुण अॅरॉन, मनोज तिवारी आणि फैज फझल यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा पुरेपूर आनंद लुटला असून आता हे क्रिकेटपटू  ज्या ठिकाणाहून आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरूवात केली त्या ठिकाणी निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Advertisement

2024 च्या रणजी स्पर्धेत सोमवारी बंगालने बिहारवर मनोज तिवारीच्या नेतृत्वाखाली शानदार विजय मिळविला. या विजयानंतर मनोज तिवारीने आपल्या 19 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला निरोप देत असल्याची घोषणा केली. 38 वर्षीय मनोज तिवारीने गेल्या वर्षी रणजी स्पर्धेत बंगालला अंतिम फेरीपर्यंत नेले होते. मनोज तिवारी हा बंगालचा कर्णधार आणि भरवशाचा फलंदाज असून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10 हजार पेक्षा अधिक धावा नोंदविल्या आहेत.

झारखंड संघातील वरुण अॅरॉन आणि सौरभ तिवारी यांनीही देशी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पण झारखंडला या दोन्ही क्रिकेटपटूंची उणीव काही दिवस निश्चितच भासेल. सौरभ तिवारी हा डावखुरा मध्य फळीतील उपयुक्त फलंदाज असून 2006-07 च्या रणजी हंगामात त्याने आपले प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पर्दापण केले. सौरभ तिवारीने 115 प्रथम श्रेणी सामन्यात 47.51 धावांच्या सरासरीने 22 शतके आणि 34 अर्धशतकांसह 8030 धावा जमविल्या आहेत. नवोदित दर्जेदार खेळाडूंना योग्य वेळी संघात स्थान मिळावे या हेतूने सौरभ तिवारीने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. झारखंड संघातील वेगवान गोलंदाज वरुण अॅरॉन याला वारंवार दुखापती समस्येने दमवले. 2010-11 च्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात अॅरॉनने ताशी 153 कि.मी. वेगाने गोलंदाजी करत निवड समितीचे तसेच क्रिकेट शौकिनांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. ऑरॉनने 66 प्रथम श्रेणी सामन्यात 173 गडी बाद केले आहेत.

फैज फझलने आपल्या 21 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये देशी क्रिकेट प्रकारात विदर्भची सेवा बजावली आहे. फैज फझल हा सलामीचा फलंदाज असून त्याने 2018 साली विदर्भला पहिल्यांदा रणजी करंडक जिंकून देण्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले होते. 2003 च्या डिसेंबरमध्ये फझलने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट पदार्पणात जम्मू-काश्मिर संघा विरुद्धच्या रणजी सामन्यात 151 धावांची खेळी केली होती. फझलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 9183 धावा जमविल्या असून तो लिस्ट ए क्रिकेट आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विदर्भकडून सर्वाधिक धावा जमविणारा फलंदाज आहे. 2016 साली 38 वर्षीय फझलने झिम्बाब्वे विरुद्ध वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करताना नाबाद 55 धावा जमविल्या होत्या. पण त्यानंतर त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळू शकले नाही.

मुंबई संघातील वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी याने राष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या दर्जेदार गोलंदाजीची ओळख करुन दिली आहे. स्वींग गोलंदाजी करणारा तो मुंबईचा हुकमी वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये त्याने तीन वेळेला रणजी स्पर्धेत मुंबईला अंतिम फेरी गाठून दिली. मुंबई संघातील तो एक अनुभवी गोलंदाज असल्याचे मुंबई क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले. 35 वर्षीय धवल कुलकर्णीने 95 प्रथम श्रेणी सामन्यात 27.31 धावांच्या सरासरीने 95 गडी बाद केले आहेत. चालू वर्षीच्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामाअखेर तो निवृत्त होत आहे.

Advertisement
Tags :

.