काँग्रेस कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक
बेंगळूर : काँग्रेस कार्यकर्ता गणेश गौडा यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. 5 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजता चिक्कमंगळूर जिल्ह्याच्या सखरायपट्टण येथील बारजवळ दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. बारजवळ झालेल्या या हाणामारीनंतर अर्ध्या तासाने कलमुरुडेश्वर मठाजवळ पुन्हा हाणामारी झाली होती. यावेळी वाद विकोपाला गेला. दरम्यान, संजय आणि मिथून या दोघांनी गणेश गौडावर कोयत्यांनी वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गणेशचा जागीच मृत्यू झाला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख विक्रम आमटे यांनी चार विशेष पथके नेमण्याची सूचना केली होती. याप्रकरणी पाच जणांना अटक केली असून फरार असलेल्या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. अजय, नितीन उर्फ सैन्स आणि दर्शन उर्फ जपान यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर सखरायपट्टण येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शनिवारी येथे 100 पोलीस आणि केएसआरपीच्या तुकडीचे नियोजन केले होते. रविवारी पुन्हा 80 पोलिसांचे नियोजन करण्यात आले आहे.