गौंडवाड खून प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेप
चौघांना एक वर्षाची शिक्षा; 16 जण निर्दोष : मृताच्या कुटुंबीयांकडून समाधान व्यक्त
प्रतिनिधी/ बेळगाव
आनंद रामा कुट्रे, शशिकला आनंद कुट्रे, अर्णव आनंद कुट्रे, जयाप्पा भैरू निलजकर, महांतेश जयाप्पा निलजकर सर्वजण राहणार गौंडवाड अशी जन्मठेपची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर परशराम मारुती मुतगेकर, सुरेखा जयाप्पा निलजकर, संजना जयाप्पा निलजकर, वसंत पुंडलिक पाटील चौघेही राहणार गौंडवाड अशी एक वर्षाची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
18 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 9 च्या दरम्यान यादव यल्लाप्पा पाटील यांच्या किराणा दुकानासमोर आरोपी अर्णव आनंद कुट्रे हा इनोव्हा कार पार्किंग करत होता. याच कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यावेळी त्या ठिकाणी आनंद कुट्रे, जयाप्पा निलजकर, शशिकला, महांतेश यांनी देखील भांडणात उडी घेतली. लक्ष्मी मंदिरमध्ये भैरवनाथ स्व-साहाय्य महिला संघाची मिटींग सुरू होती. त्यामुळे भांडणाचा आवाज ऐकून त्या ठिकाणी पूजा पाटील, सोनम, सुमन, रुपा, रेखा, उमेश, राजेंद्र, नंदू जमा झाले.
सतीश पाटील हा एमआर होता. त्याचबरोबर गावात मेडिकल दुकान चालवत होता. रात्री 9 च्या दरम्यान मेडिकल बंद करून तो श्री काळभैरवनाथ मंदिराजवळ सुरू असलेल्या तंट्याच्या ठिकाणी आला. ‘भांडण कशासाठी सुरू आहे?’ अशी विचारणा त्याने केली. तितक्यात आणखी 20 जण त्या ठिकाणी आले. आरोपी आनंद याने पत्नी शशिकला हिला घरातून जांबिया आणण्यास सांगितले. आनंदने सतीशवर अचानक हल्ला करून पाठीत जांबिया खुपसला. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या नंदू निलजकर याने सतीशवरील हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याही हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर जयाप्पा याने आणखी एका जांबियाने सतीशच्या बरगड्यांमध्ये वार केला. त्यामुळे सतीश गंभीर जखमी होऊन खाली कोसळताच तेथील जमावाने महेश पिंगट यांच्या वाहनातून त्याला एका खासगी इस्पितळात दाखल केले. मात्र, त्याचा उपचाराचा उपयोग न होता रात्री 9.30 च्या दरम्यान मृत्यू झाला. ही माहिती गावात पसरताच संतप्त जमावाने वाहनांची जाळपोळ केली. त्यामुळे गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी सतीशची पत्नी पूजा यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिल्याने पोलिसांनी 25 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून घेऊन आरोपींना अटक केली. या प्रकरणी आनंद कुट्रे, अर्णव कुट्रे, जयाप्पा निलजकर, महांतेश निलजकर, शशिकला कुट्रे, लक्ष्मी कुट्रे, सुरेखा निलजकर, संजना निलजकर, व्यंकट कुट्रे, सिद्धाप्पा मुतगेकर, दौलत मुतगेकर, वसंत पाटील, संजय कुट्रे, संगीता कुटे, लखन निलजकर, केदारी पाटील, प्रेमा पाटील, भरत पाटील, मारुती पाटील, टोपाण्णा पाटील, गजानन बिर्जे, परशराम मुतगेकर, कल्लाप्पा अष्टेकर, महेश सांबरेकर, बसवंत मुतगेकर सर्वजण राहणार गौंडवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी काकतीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक गुरुनाथ यांनी तपास हाती घेतला. मात्र, या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून मार्केटचे तत्कालिन एसीपी सदाशिव कट्टीमनी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार त्यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात 18 साक्षी, 96 कागदोपत्री पुरावे, 128 मुद्देमाल तपासण्यात आले. त्याचबरोबर पाच प्रत्यक्ष साक्षीदार आणि डॉक्टरांनी दिलेल्या साक्षीदरम्यान 9 जणांवर आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांना 19 ऑगस्ट रोजी दोषी ठरविले होते.
शनिवार दि. 23 ऑगस्ट रोजी न्या. गंगाधर के. एन. यांनी भादंवि कलम 302 नुसार आरोपी आनंद कुट्रे, शशिकला कुट्रे, अर्णव कुट्रे, जयाप्पा निलजकर, महांतेश निलजकर यांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपींना अतिरिक्त दीड वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे. तर सुरेखा निलजकर, संजना निलजकर, वसंत पाटील, परशराम मुतगेकर यांना भादंवि कलम 323 नुसार एक वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अॅड. जी. के. माहूरकर, अॅड. भारती होसमनी यांनी काम पाहिले. सरकारी वकिलांच्या मदतीस अॅड. शामसुंदर पत्तार यांनीही वकालत दाखल केली होती.
यापूर्वीही सतीशवर हल्ला
सतीश पाटील हा गावातील काळभैरवनाथ देवस्थान व कलमेश्वर देवस्थानची जागा वाचविण्यासाठी लढा देत होता. याच कारणातून यापूर्वीही 30 नोव्हेंबर 2020 रोजी त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणी आरोपींच्या विरोधात एपीएमसी पोलीस स्थानकात त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला होता.
कुटुंबाची जबाबदारी पत्नीवर
मयत सतीश पाटील याच्या पश्चात आई, पत्नी आणि मायरा (वय 9 वर्षे), शिवांश (वय 4 वर्षे) असे कुटुंब आहे. मुले अजाण असतानाच त्यांच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपल्याने मुले पोरकी झाली आहेत. घरात कर्ता पुरुषही नसल्याने घर चालविण्यासह मुलांचे शिक्षण व इतर सर्व सतीशची पत्नी पूजा यांनाच पहावे लागत आहे.
उच्च न्यायालयाचा आदेश
पती सतीश पाटील याचा देवस्थान जमिनीच्या वादातून आरोपींनी खून केल्यानंतर मारेकऱ्यांना तातडीने शिक्षा व्हावी, यासाठी पत्नी पूजा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार उच्च न्यायालयाने सदर प्रकरणाचा तातडीने निकाल देण्याचे निर्देश द्वितीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाला दिले होते. त्यानुसार तीन वर्षांत या खून खटल्याचा निकाल देण्यात आला.
सरकारी वकिलांची भूमिका महत्त्वाची
सतीश पाटीलचा खून करण्यात आल्यानंतर सरकारी वकिल जी. के. माहूरकर यानी महत्वाची भुमीका निभावली. स्वत: घटनास्थळी भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर न्यायालयात युक्तीवाद कऊन आपली बाजू मांडली. अलिकडेच ते सेवानिवृत्त झाल्यानंतर सरकारी वकिल म्हणून भारती होसमनी यानी काम पाहिले. आरोपींना शिक्षा झाल्याने सतीशच्या कुटुंबीयानी सरकारी वकिलांची देखील कृतज्ञता व्यक्त केली.
गौंडवाडला पोलीस छावणीचे स्वरूप
देवस्थान जागेच्या वादातून सतीश राजेंद्र पाटील (वय 36) या तरुणाचा खून करणाऱ्या आरोपींना शनिवारी न्यायालयाकडून शिक्षा ठोठावली जाणार आहे, असे 19 ऑगस्ट रोजी ग्रामस्थांना समजले. त्यामुळे सर्व ग्रामस्थांच्या नजरा शनिवार दि. 23 ऑगस्ट रोजीच्या न्यायालयीन सुनावणीकडे लागून राहिल्या होत्या. न्यायालय आरोपींना कोणती शिक्षा सुनावणार हे ऐकण्यासाठी आतुर झालेल्या गौंडवाड ग्रामस्थांनी शेती व आपली दैनंदिन कामे बाजूला ठेवून न्यायालयात मोठी गर्दी केली होती. गावात केवळ शाळकरी मुलेच घरांमध्ये पहावयास मिळाली. मात्र, खबरदारी म्हणून पोलिसांनी गावात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
सतीश पाटील या तरुणाच्या खून प्रकरणाचा खटला द्वितीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सदर खटल्यात 19 ऑगस्ट रोजी पाच आरोपींना भादंवि कलम 302 अंतर्गत न्यायालयाने दोषी ठरविले. तर उर्वरित चौघांनाही दोषी ठरविल्याचे समजताच ग्रामस्थांमध्ये निकालाची उत्सुकता लागून राहिली होती. त्यामुळे 23 ऑगस्ट रोजी न्यायालयाचा निकाल ऐकण्यासाठी महिला, तरुण, वृद्ध आदींनी आपली शेतातील व दैनंदिन कामे बाजूला ठेवून सकाळपासूनच न्यायालयात हजेरी लावली.
सतीश हा ग्रामस्थांसाठी लढणारा कार्यकर्ता होता. मात्र, त्याचा खून झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. सकाळच्या दरम्यान न्यायालयात न्यायाधीशांनी आरोपींना विविध प्रश्न विचारले. त्यानंतर दुपारी निकाल जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दुपारी अडीचनंतर न्यायालय आवारात मोठी गर्दी झाली. सकाळच्या दरम्यान झालेली गर्दी पाहून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. न्यायालयासमोरच ग्रामस्थ व महिलांनी ठाण मांडले. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, या दृष्टिकोनातून काकतीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावात पथसंचलन केले. तसेच सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. निकाल ऐकण्यासाठी जणू सर्व गावच न्यायालयात हजर होते. घरांमध्ये केवळ शालेय विद्यार्थी होते. एकंदरीत गावात स्मशानशांतता पसरली होती. निकाल ऐकल्यानंतर अनेक जण जड अंत:करणाने माघारी फिरले.
निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात ठेवण्यात आलेला पोलीस बंदोबस्त.
सतीश पाटील खून प्रकरणाचा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केल्याने खबरदारी म्हणून पोलीस खात्याच्यावतीने न्यायालय परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. मार्केटचे साहाय्यक पोलीस आयुक्त, ग्रामीणचे साहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह बहुतांश पोलीस स्थानकांचे निरीक्षक व उपनिरीक्षक, त्याचबरोबर शहर सशस्त्र राखीव दलाची तुकडी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली होती.
देवस्थान जमिनीच्या वादातून 2022 मध्ये गौंडवाड येथे सतीश पाटील या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्यामुळे सदर खटल्याची सुनावणी गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयात सुरू होती. सदर खटल्याचा निकाल शनिवारी दिला जाणार होता. त्यामुळे ग्रामस्थ व विविध गावांतून आलेल्या लोकांनी न्यायालय आवारात मोठी गर्दी केली. सुरुवातीला काही मोजकेच पोलीस अधिकारी व कर्मचारी आरोपींना घेऊन न्यायालयात हजर होते. मात्र, हळूहळू न्यायालयात गर्दी वाढत गेल्याने उपस्थित अधिकाऱ्यांनी ही माहिती तातडीने आपल्या वरिष्ठांना दिली. त्यानंतर काहीवेळातच विविध पोलीस स्थानकांचे निरीक्षक, उपनिरीक्षक व त्यांचे सहकारी न्यायालय आवारात दाखल झाले. इतकेच नव्हेतर शहर सशस्त्र राखीव दलाची एक तुकडीही तैनात करण्यात आली. न्यायालयासमोर ठाण मांडून बसलेल्या ग्रामस्थांना न्यायालयाने निकाल दिल्यानंतर बाहेर जाण्यास सांगण्यात आले. पण उशिरापर्यंत आरोपींना न्यायालयातून बाहेर काढण्यात आले नाही. जमाव न्यायालयाबाहेर थांबून असल्याने पोलिसांनीही सावध भूमिका घेतली. एकंदरीत न्यायालय व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
...अन् तपास अधिकारी बदलला
एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्याकडून योग्य कायदेशीर तपास
गौंडवाड येथील श्री काळभैरवनाथ देवस्थानाच्या जागेसंदर्भात सुरू असलेल्या वादातून 18 जून 2022 रोजी सतीश पाटीलचा खून करण्यात आला. याप्रकरणी काकती पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला काकतीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक गुरुनाथ यांनी तपास हाती घेतला. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्कालिन पोलीस आयुक्तांनी 22 जून 2022 रोजी या प्रकरणाचा तपास अधिकारी बदलून मार्केटचे साहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमनी यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली. एसीपी कट्टीमनी यांनी साक्षीपुरावे, मुद्देमाल व पंचनामा कायदेशीररीत्या पूर्ण करून न्यायालयात दोषारोप दाखल केला. तपास अधिकाऱ्यांमुळेच आरोपींना योग्य शासन झाले, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
काळभैरवनाथ मंदिराच्या बाजूला कार पार्किंग करण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी त्या ठिकाणी सतीश पाटील गेला असता त्याला जांबियाने भोसकून जबर जखमी करण्यात आले. त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर रात्री 9.30 च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही माहिती गावात येऊन धडकताच संतप्त जमावाने अनेक वाहनांची जाळपोळ केली. त्यामुळे गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काहींनी ही माहिती काकतीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक गुरुनाथ यांना दिली. मात्र, ते वेळेत गावात पोहोचले नाहीत, असा ठपका त्यांच्यावर त्यावेळी ठेवण्यात आला होता. सुरुवातीला त्यांनी या प्रकरणाचा तपास केला. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच तपास अधिकारी पदावरून त्यांना बाजूला करण्यात आले. पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार मार्केटचे तत्कालिन साहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमनी यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी वारंवार गावाला भेट देऊन साक्षीपुरावे, मुद्देमाल जमा केले. त्यानंतर कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोप दाखल केला. तपास अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया व्यवस्थितरीत्या पूर्ण केल्याने या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होण्यास मदत झाली, असे न्यायाधीशांनीही अधोरेखित केले. त्याचबरोबर उपस्थित ग्रामस्थांनीही तपास अधिकाऱ्यांबाबत समाधान व्यक्त केले.
‘मरावे परी किर्ती रुपे उरावे’ ‘मरावे परी किर्ती रुपे उरावे’
‘मरावे परी कीर्ती रुपे उरावे या’ ओळी सार्थ ठराव्यात, असे सतीश पाटील यांचे व्यक्तिमत्त्व होते. सतीशचा खून होऊन तीन वर्षे उलटले परंतु प्रत्येक गावकऱ्यांच्या मनात त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. वास्तविक त्याचे एकूण व्यक्तिमत्त्व ‘आपण बरे, आपले काम बरे’ असेच होते. तो अनगोळ येथील कलावती आईंचा भक्त असल्याने अनगोळ हरिमंदिरला तो सतत जात असे.
त्यांने डी-फार्माचे शिक्षण घेतले आणि एका मेडिकल कंपनीमध्ये तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून रुजू झाला. गावातील मंदिराच्या जागेवर असलेली चार चाकी हटविण्यावरून सुरु झालेल्या वादाचे पर्यावसन सतीशवर हल्ला करण्यात झाले. आणि इस्पितळात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यादिवशी हे सत्य त्याची पत्नी पूजा आणि आई यांच्यापासून लपवून ठेवण्यात आले.
जोपर्यंत सतीशचा चेहरा पाहणार नाही. तोपर्यंत पाण्याचा थेंब घेणार नाही, असे त्याच्या पत्नी पूजा यांनी सांगितले. अनेकांनी सांगूनसुद्धा त्यानी खरोखरच पाण्याचा थेंबही घेतला नाही. दुसऱ्यादिवशी संध्याकाळी सतीशचा मृतदेह पाहिल्यावर मात्र त्यांचे अवसान गळाले आणि त्यांचा टाहो आसमंत भेदून गेला.
सतीशचा स्वभाव हा दुसऱ्यांना मदत करण्याचा. आणि मैत्री जोडण्याचा होता. वैद्यकीय कंपनीत असल्याने गावात कोणालाही औषधाची गरज भासल्यास तो आणून देत असे. कित्येकदा त्यांनी कोणाकडून पैसेही घेतलेले नाही. सतीशकडे शेतीसाठी लागणारे सर्व अवजारे होती. गावातील गरजू शेतकऱ्यांना तो ती विनामूल्य वापरण्यास देत असे. यामध्ये अगदी टॅक्टरचाही समावेश होता.
आपल्या गावात अनेक सुधारणा व्हाव्यात, यासाठी त्याची धडपड होती. कोरोना काळात अनेकांना त्यांनी औषधासह विविध स्वरुपात मदत केली. अनेक कर्करुग्णांना त्याचा आधार वाटत असे. दुर्दैवाने सतीशचा खून झाला आणि गावाने एक हरहुन्नरी धडपडणारा कार्यकर्ता गमावला. त्याच्या मृत्यूनंतरही गावकऱ्यांनी आपली एकजूट अभेद्य ठेवली. सतीशच्या शेतीमध्ये आज गावातील लोक काम करतात. त्याचा मोबदला मिळावा ही अपेक्षासुद्धा त्यांनी ठेवलेली नाही. त्याचे मित्र पुजाला आपली बहीण मानून तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. कुटुंबियांच्या बरोबर आणि गावकऱ्यांच्याही मनात सतीश स्मृतीरुपाने सतत जागता आहे. हेच त्याचे वैशिष्ट्या होते, असे म्हणावे लागेल.
पाच प्रत्यक्ष साक्षीदार, डॉक्टरांची साक्ष ठरली महत्त्वाची
सतीश पाटील खून प्रकरणात न्यायालयात सरकार पक्षातर्फे एकूण 18 साक्षी, 96 कागदोपत्री पुरावे आणि 128 मुद्देमाल तपासण्यात आले. विशेषकरून 5 प्रत्यक्ष साक्षीदारांनी दिलेली साक्ष या खून प्रकरणात महत्त्वाची ठरली. साक्षीदार पूजा पाटील, यादव पाटील, सोनम पाटील, नंदू निलजकर आणि उमेश पाटील यांनी न्यायालयात ठामपणे साक्ष दिल्याने आरोपी दोषी ठरण्यासह त्यांना शिक्षा मिळाली, असे हा खटला पाहणारे निवृत्त सरकारी वकील जी. के. माहूरकर यांनी सांगितले.
18 जून 2022 रोजी या खून प्रकरणातील दोन नंबरचा आरोपी अर्णव आनंद कुट्रे हा साक्षीदार यादव पाटील यांच्या दुकानासमोर कार पार्किंग करण्यावरून वाद सुरू झाला. त्यावेळी आनंद कुट्रे, जयाप्पा निलजकर, शशिकला व महांतेश यांनीही या वादात उडी घेतली. त्यावेळी लक्ष्मी मंदिरमध्ये भैरवनाथ महिला स्व-साहाय्य संघाची बैठक सुरू होती. पूजा पाटील, सोनम, रुपा, रेखा, उमेश, राजेंद्र, नंदू आदींनी त्या ठिकाणी वादावादी सुरू झाल्याचे समजल्यानंतर धाव घेतली.
तितक्यात रात्री 9 च्या दरम्यान मेडिकल दुकानातून सतीश पाटील त्या ठिकाणी आला. ‘कशावरून भांडण सुरू आहे?’ अशी विचारणा त्याने केली. इतक्यात आणखी 20 आरोपी त्या ठिकाणी आले व दोन जांबियांनी सतीशला भोसकून त्याचा खून करण्यात आला. याप्रकरणी काकती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारी वकील म्हणून काम पाहणारे जी. के. माहूरकर यांनी प्रत्यक्ष गावाला भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात सादर केलेला दोषारोप व 18 साक्षीदार, 96 कागदोपत्री पुरावे व 128 मुद्देमाल तपासण्यात आले. पण यामध्ये प्रामुख्याने पूजा पाटील, यादव पाटील, सोनम पाटील, नंदू निलजकर व उमेश पाटील या पाच प्रत्यक्ष साक्षीदारांनी दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली.
त्याचबरोबर ज्या खासगी रुग्णालयात सतीशला दाखल करण्यात आले होते, त्या दवाखान्यातील डॉ. सोमशेखर पुजार यांची देखील साक्ष या दाव्यात महत्त्वपूर्ण ठरली. पाच प्रत्यक्ष साक्षीदार आणि डॉक्टरांनी ठामपणे आरोपींविरोधात साक्ष दिल्याने न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली.
आणखी दोघांना शिक्षा व्हायला हवी होती ,नलिनी राजेंद्र पाटील (सतीश यांची आई)
गावच्या देवस्थानची जमीन वाचवण्यासाठी सतीश लढा देत होता. मात्र, त्याचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला. या प्रकरणात न्यायालयाने आरोपींना शिक्षा दिली असली तरी आणखी दोघांना शिक्षा व्हायला हवी होती. न्यायदेवतेवर या निकालामुळे आपला विश्वास दृढ झाला आहे. मुलगा गेल्याच्या धक्क्यानंतर 23 ऑक्टोबर 2024 रोजी माझ्या पतीचेही निधन झाले. घरचे कर्ते पुरुष गेल्याने आम्हा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
आरोपींना जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा व्हायला हवी होती, पूजा सतीश पाटील (सतीशची पत्नी)
गावातील देवस्थानची जमीन काहींनी आपल्या नावावर करून घेण्यासह तेथे प्लॉट पाडले होते. ही बाब आपला पती व ग्रामस्थांनी उघडकीस आणल्याने माझ्या पतीवर आरोपींनी राग धरला होता. त्यातूनच तीन वर्षांपूर्वी पती सतीश यांना ठार करण्यात आले. माझा पती सत्यासाठी लढणारा होता. त्यामुळेच ग्रामस्थांनीही साथ दिली. ग्रामस्थांच्या पाठिंब्यामुळेच तीन वर्षांनंतर आम्हाला न्याय मिळाला असून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. पण आरोपींना जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा व्हायला हवी होती. आणखी दोघांना शिक्षा होणे गरजेचे होते. ते आरोपी आपल्या शेजारीच राहतात. त्यामुळे अद्यापही आम्हाला धोका आहे.
सत्याच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला, नीता अजय अपराध (सतीश पाटील यांची बहीण)
भावाचा खून झाल्यानंतर न्यायालयाकडून आम्हाला योग्य न्याय मिळेल, अशी आशा होती. तीन वर्षे वाट पाहिल्यानंतर सत्याच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला आहे. न्याय मिळण्यास उशीर झाला तरी आरोपींना योग्य शिक्षा झाली, याचे समाधान आहे. आपला माणूस गेल्याचे दु:ख कायम आहे. पण न्यायदेवतेने आरोपींना शिक्षा दिल्याचेही समाधान आहे.