फिचने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढविला
अमेरिकेच्या टॅरिफचा अर्थव्यवस्थेवर किरकोळ परिणाम होईल : 6.5 वरुन 6.9 टक्के केली वाढ
नवी दिल्ली :
जागतिक रेटिंग एजन्सी फिचने 2025-26 आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 6.5 वरून 6.9 टक्केपर्यंत वाढवला आहे. हा बदल देशांतर्गत मागणी आणि मजबूत आर्थिक क्रियाकलापांमुळे संस्थेने नव्याने केला आहे.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात, फिचने म्हटले आहे की खासगी वापर आणि गुंतवणुकीमुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. तथापि, जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी आणि तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार यासारखी आव्हाने आहेत, परंतु भारताने त्यांचा सामना केला आहे. फिचने म्हटले आहे की मजबूत देशांतर्गत धोरणे आणि गुंतवणुकीच्या वाढत्या गतीमुळे भारत योग्य मार्गावर आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये औद्योगिक उत्पादन आणि सेवा क्षेत्रातही सुधारणा होण्याची शक्यता आहे.
टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर किरकोळ परिणाम
यापूर्वी, फिचने म्हटले होते की अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय अर्थव्यवस्थेवर किरकोळ परिणाम होईल. अहवालानुसार, तो अखेर कमी केला जाऊ शकतो. फिचने भारताचे क्रेडिट रेटिंग बीबीबीवर कायम ठेवले आहे. रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की अमेरिकेला होणारी निर्यात भारताच्या जीडीपीच्या फक्त 2 टक्के आहे, म्हणून या टॅरिफचा थेट परिणाम किरकोळ असेल. तथापि, टॅरिफवरील अनिश्चिततेचा गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम होईल.
एस अॅण्ड पी ग्लोबल : भारताचे क्रेडिट रेटिंग अपग्रेड
जागतिक रेटिंग एजन्सी एस अॅण्ड पी ग्लोबलने भारताचे दीर्घकालीन क्रेडिट रेटिंग बीबीबीवर अपग्रेड केले आहे. त्याच वेळी, भारतीय अर्थव्यवस्थेचा दृष्टिकोन स्थिर ठेवण्यात आला आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचे एस अँड पी म्हणते. सरकार सतत त्याच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय, भारताचा आर्थिक विकासही वेगाने होत आहे, जे या अपग्रेडचे एक प्रमुख कारण आहे.
रेटिंग वाढीचा काय फायदा होईल?
याचा अर्थ जगभरातील गुंतवणूकदारांचा भारतावर अधिक विश्वास असेल, कारण चांगले रेटिंग भारताला कर्ज घेणे सोपे आणि स्वस्त बनवू शकते. तसेच, हे दर्शवते की भारताची अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे.
जागतिक बँकेने आपला जीडीपी वाढीचा अंदाज 6.3 टक्के वर कायम ठेवला आहे. जूनमध्ये जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 साठी भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज 6.3 टक्केवर कायम ठेवला होता. गेल्या वर्षी तो 6.5 टक्के होता. एप्रिलमध्ये, जागतिक बँकेने 2025-26 साठी भारताचा विकासदर जानेवारीतील 6.7 वरून 6.3 टक्केवर आणला आहे.