Sangli News: कर्जाला कंटाळून मच्छीमाराची आत्महत्या; शासनाच्या धोरणांवर सवाल
मत्स्यपालन करणाऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई किंवा मदत मिळत नाही
By : शिवराज काटकर
जत : जत तालुक्यातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या सुभाष चापलू लमान (वय ४५) या मत्स्य शेतकऱ्याने सततच्या आर्थिक अडचणींना कंटाळून करजगी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते सेवालाल मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, भिवरगीचे सक्रिय सभासद होते.
राज्य शासनाने नुकताच मत्स्य व्यवसायाला शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यता दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात या व्यवसायात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांप्रमाणे मत्स्यपालन करणाऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई किंवा मदत मिळत नाही. शासनाच्या या दुटप्पी धोरणामुळे मत्स्यपालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
जत तालुक्याच्या पूर्व भागात यंदाही पावसाने दडी मारल्यामुळे तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे मत्स्य उत्पादन थांबले असून सहकारी संस्थांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उत्पादन थांबल्याने अनेक सभासदांना कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी खाजगी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. अशाच परिस्थितीत सुभाष लमान यांच्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते.
या घटनेमुळे मत्स्यपालकांच्या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या असून शासनाने मत्स्य व्यवसायिकांना विमा संरक्षण, नुकसानभरपाई व आर्थिक मदत योजना तत्काळ लागू करावी, अशी मागणी जत तालुक्यातील मत्स्य व्यवसायिकांतून होत आहे. "शेतीपूरक म्हणताच, पूरक मदतीचं काय?" असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.