For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने मत्स्य उत्पादनात वाढ

12:05 PM Oct 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने मत्स्य उत्पादनात वाढ
Advertisement

दरवर्षी 222 तलावांमध्ये मत्स्यपालन खात्याकडून माशांची पिल्ले सोडली जातात : 141 हून अधिक तलाव मासेमारीसाठी उपयुक्त

Advertisement

बेळगाव : गेल्या दोन वर्षांपासून चांगला पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील तलाव पूर्ण क्षमतेने भरत आहेत. त्यामुळे मत्स्य उत्पादनात वाढ होत असून, दरवर्षी जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात वाढ होत चालली आहे. जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील हिडकल, सौंदत्ती तालुक्यातील नविलतीर्थ (मलप्रभा), बेळगाव तालुक्यातील राकसकोप, मार्कंडेय जलाशय, बैलहोंगल तालुक्यातील तिगडी हरिनाला जलाशय आणि 40 हेक्टरपेक्षा अधिक जास्त पाणलोट क्षेत्र असलेल्या 222 तलावांमध्ये मत्स्यपालन खात्याकडून दरवर्षी माशांची पिल्ले सोडली जात आहेत. जिल्ह्यात 4643 पूर्णवेळ मच्छीमार आहेत. तर 2530 जण अर्धवेळ कामकार म्हणून मत्स्य पालनात गुंतलेले आहेत.

जलाशय भरल्यामुळे माशांचे उत्पादन वाढले आहे. 2021-22 मध्ये जिल्ह्यात 5610 टन माशांचे उत्पादन झाले. 2024-25 मध्ये ते वाढून 10 हजार 380 टन इतके झाले आहे. अलिकडच्या काळात नागरिक मत्स्यपालन करण्यात उत्साह दर्शवत आहेत. जिल्ह्यात 28 मत्स्यपालन सहकारी संस्था आहेत. चिकोडीमध्ये वेदगंगा मच्छीमार उत्पादक संघटना सुरू करण्यात आली आहे. तर हुनशीकट्टीमध्ये मलप्रभा शेतकरी उत्पादक संघटना सुरू करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, विभागाने मच्छीमारांचे जीवन सुधारण्यासाठी आणि आधुनिक सुविधा पुरविण्यासाठी पावले उचलली आहेत.

Advertisement

141 हून अधिक तलाव मासेमारीसाठी उपयुक्त

जिल्ह्यातील तलाव आणि जलाशयामध्ये एकूण क्षेत्रफळ 31,054 हेक्टर आहे, आणि 300 कि. मी. नदीकाठच्या पाण्याच्या क्षेत्रात मच्छीमारी केली जात आहे. मलप्रभा, हिडकल डॅम, राकसकोप, मार्कंडेय, तिगडी जलाशयांमध्ये मासेमारीसाठी भरपूर संधी आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही जलाशये जवळजवळ भरलेली आहेत. या व्यतिरिक्त मासेमारीसाठी म्हणून ओळखले जाणारे 141 हून अधिक तलाव पावसाळ्यात भरतात ते मासेमारीसाठी उपयुक्त ठरत आहेत. दरवर्षी मत्स्य व्यवसाय विभाग शेतकऱ्यांना माशांच्या पिल्लांचा पुरवठा करतो. जुलैच्या सुरुवातीपासून ते मार्चपर्यंत माशांची पिल्ले सोडली जातात. गतवर्षी जिल्ह्यात एकूण 107 लाख माशांची पिल्ले सोडण्यात आली होती. यावेळी अवघ्या चार महिन्यात 44 लाख माशांची पिल्ले सोडण्यात आली आहेत.

मार्च 2026 पर्यंत आणखी 60 लाख माशांची पिल्ले सोडण्याचे उद्दिष्ट

मार्च 2026 पर्यंत आणखी 60 लाख माशांची पिल्ले सोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हिडकल आणि सौंदत्ती येथे माशांच्या पिलांची संगोपन केंद्रे आहेत. गेंडे जातीच्या माशांना मोठी मागणी आहे. त्याचबरोबर काटला, रोवो आणि मृगाल आदी जातीच्या माशांची पिल्ले सोडण्यात आली आहेत.

Advertisement
Tags :

.