पहिली कसोटी : लंकेचे बांगलादेशला चोख प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/गॅले
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत गुरूवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर यजमान लंकेने बांगलादेशला चोख प्रत्युत्तर दिले. या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 495 धावांचा डोंगर रचल्यानंतर श्रीलंकेने दिवसअखेर पहिल्या डावात 4 बाद 368 धावा जमविल्या. पाथूम निशांकाने शानदार दीड शतक (187) तर चंडीमलने अर्धशतक झळकविले. लंकेचा संघ अद्याप 127 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे सहा गडी खेळावयाचे आहेत.
बांगलादेशने 9 बाद 484 या धावसंख्येवरुन गुरारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांचा डाव 153.4 षटकात 495 धावांवर आटोपला. त्यांच्या शेवटच्या जोडीने 11 धावांची भर घातली. बांगलादेशच्या पहिल्या डावात मुश्फिकुर रहीमने 9 चौकारांसह 163, कर्णधार नजमुल शांतोने 1 षटकार आणि 15 चौकारांसह 148, लिटन दासने 1 षटकार आणि 11 चौकारांसह 90 तर मोमिनुल हकने 4 चौकारांसह 29 धावा जमविल्या. लंकेतर्फे असिता फर्नांडोने 86 धावांत 4, मिलन रत्ननायकेने 39 धावांत 3 तर टी. रत्ननायकेने 196 धावांत 3 गडी बाद केले.
निशांकाचे शतक
उपाहारानंतर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये लंकेने 133 धावा जमविताना एकमेव गडी गमविला. चहापानापर्यंत लंकेने 60 षटकात 2 बाद 233 धावांपर्यंत मजल मारली होती. निशांकाने आपले दर्जेदार शतक पूर्ण केले. चहापानावेळी निशांका 126 तर मॅथ्युज 21 धावांवर खेळत होते. या दुसऱ्या सत्रामध्ये निशांकाने आपले अर्धशतक 6 चौकारांसह 88 चेंडूत झळकविले. निशांका आणि चंडीमल यांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी 161 चेंडूत नोंदविली. चंडीमलने 99 चेंडूत 4 चौकारांसह अर्धशतक नोंदविले. चंडीमल आणि निशांका यांनी दुसऱ्या गड्यासाठी दीड शतकी भागिदारी 205 चेंडूत केली. लंकेचे द्विशतक 290 चेंडूत पूर्ण झाले. निशांकाने 136 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह शतक पूर्ण केले. या सत्रामध्ये लंकेने चंडीमलच्या रुपात दुसरा गडी गमविला.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश प. डाव 153.4 षटकात सर्वबाद 495 (नजमुल हुसेन शांतो 148, मुश्फिकुर रहीम 163, दास 90, मोमिनुल हक 29, नईम हसन 11, शदमान इस्लाम 14, अवांतर 19, असिता फर्नांडो 4-86, मिलन रत्ननायके 3-39, टी. रत्ननायके 3-196),
लंका प. डाव 93 षटकात 4 बाद 368 (पी. निशांका 187, उदारा 29, चंडीमल 54, अँजेलो मॅथ्युज 39, कमिंदु मेंडीस खेळत आहे 37, धनंजय डिसिल्वा खेळत आहे 17, अवांतर 5, हसन मेहमुद, तैजुल इस्लाम, नईम हसन आणि मोमिनुल हक प्रत्येकी 1 बळी)