पहिली कसोटी : बांगलादेशचा संघ मोठ्या विजयाच्या दिशेने
वृत्तसंस्था/सिलेत
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत गुरूवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर यजमान बांगलादेशचा संघ मोठा विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आयर्लंडचा संघ अद्याप 215 धावांनी पिछाडीवर असून त्यांची दुसऱ्या डावात स्थिती 5 बाद 86 अशी केविलवाणी झाली आहे.
या कसोटीत आयर्लंडने पहिल्या डावात 286 धावा जमविल्या. पॉल स्टर्लिंगने 9 चौकारांसह 60 तर कॅमीचेलने 7 चौकारांसह 59, कॅम्फरने 2 षटकार आणि 4 चौकारांसह 44, टकेरने 2 षटकार आणि 3 चौकारांसह 41, नीलने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 30 तर मॅकार्थीने 4 चौकारांसह 31 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे हसन मेहमुद, टी. इस्लाम, हसन मुरार, मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.
त्यानंतर बांगलादेशने पहिल्या डावात 587 धावांचा डोंगर उभा केला. 1 बाद 338 या धावसंख्येवरुन त्यांनी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि 141 षटकात त्यांनी 8 बाद 587 धावांवर डावाची घोषणा केली. मेहमुदुल हसन जॉयने 286 चेंडूत 4 षटकार आणि 14 चौकारांसह 171 धावांची खेळी करताना शदमन इस्लामसमवेत सलामीच्या गड्यासाठी 168 धावांची दीडशतकी भागिदारी केली. शदमन इस्लामने 1 षटकार आणि 9 चौकारांसह 80 धावा जमविल्या.
शदमन इस्लाम बाद झाल्यानंतर मोमिनुल हक आणि मेहमुदुल हसन जॉय यांनी दुसऱ्या गड्यासाठी 173 धावांची भागिदारी केली. मोमिनुल हकने 132 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 82 धावा झोडपल्या. मुश्फिकर रहीमने 3 चौकारांसह 23 धावा जमविल्या.
कर्णधार शांतोने 114 चेंडूत 14 चौकारांसह 100 धावा झळकविल्या. शांतो आणि लिटन दास यांनी पाचव्य गड्यासाठी 98 धावांची भर घातली. 141 षटकात बांगलादेशने 8 बाद 587 धावांवर डावाची घोषणा केली. आयर्लंडतर्फे मॅथ्यु हम्फ्रेजने 170 धावांत 5 तर मॅकार्थीने 72 धावांत 2 व मॅकब्रीनेने 1 बळी मिळविला. चहापानानंतर काही वेळातच बांगलादेशने डावाची घोषणा केली.
संक्षिप्त धावफलक
आयर्लंड प. डाव 92.2 षटकात सर्वबाद 286, बांगलादेश प. डाव 141 षटकात 8 बाद 587 डाव घोषित (मेहमुदुल हसन जॉय 171, नजमुल हुसेन शांतो 100, शदमन इस्लाम 80, मोमिनुल हक 82, लिटन दास 60, हम्फ्रेज 5-170, मॅकार्थी 2-72), आयर्लंड दु. डाव 29 षटकात 5 बाद 86 (टेक्टर 18, हॅम्पर 5, टकेर 9, हसन मुराद 2-8, नाहीद राणा व टी. इस्लाम प्रत्येकी 1 बळी).