स्वदेशी बॉम्बवर्षक युएव्हीचे पहिले यशस्वी उड्डाण
क्षेपणास्त्राने युक्त युएव्ही : कंपनीकडून घोषणा
वृत्तसंस्था/ बेंगळूर
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने भारताने आणखी एक मोठे यश मिळविले आहे. संरक्षण क्षेत्रातील कंपनी फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एअरोस्पेसने देशाच्या पहिल्या स्वदेशी बॉम्बवर्षक मानवरहित विमान (युएव्ही) एफडब्ल्यूडी 200 बीच्या पहिल्या यशस्वी उड्डाणाची मंगळवारी घोषणा केली आहे.
या युएव्हीची निर्मिती फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एअरोस्पेसने केली आहे. याचे डिझाइन, एअरफ्रेम, प्रणोदनल प्रणाली, नियंत्रण प्रणाली, इलेक्ट्रॉनिक्स सर्व भारतातील एफडब्ल्यूडीएच्या अत्याधुनिक केंद्रात निर्माण करण्यात आल्याची माहिती कंपनीचे संस्थापक आणि सीईओ सुहास तेजसंद यानी दिली आहे.
मीडियम अल्टीट्यूड (15 हजार फूट) लाँग एंड्योरेन्स (एमएएलई)युक्त एफडब्ल्यूडी 200 बी देखरेखीसाठी ऑप्टिकल पेलोड आणि हवाई हल्ले तसेच बॉम्ब वर्षाव करण्यासाठी क्षेपणास्त्रासारख्या शस्त्रांनी युक्त आहे.
या युएव्हीच्या पंखांचा फैलाव 5 मीटर आणि लांबी 3.5 मीटर इतकी आहे. याचे कमाल टेकऑफ वजन 102 किलोग्रॅम तर पेलोड क्षमता 30 किलोग्रॅम इतकी आहे. एफडब्ल्यूडी 200बी 152 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने उ•ाण करू शकते, ज्याचा कमाल वेग 250 किलोमीटर प्रतितास आहे. या युएव्हीकरता केवळ 300 मीटर लांबीची धावपट्टी पुरेशी आहे, यामुळे हे छोट्या धावपट्ट्यांवरूनही झेपावू शकते.