तुल्यबळ पंजाब-आरसीबीमध्ये आज पहिला ‘क्वालिफायर’
वृत्तसंस्था/ मुल्लानपूर (चंदिगड)
इंडियन प्रीमियर लीगच्या आज गुरुवारी येथे होणाऱ्या पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्सला तितक्याच दमदार रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचे आव्हान पेलावे लागणार असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची आतापर्यंतची ही सर्वांत कठीण परीक्षा असेल.
आघाडीच्या दोन संघांत स्थान मिळवल्यानंतर प्ले-ऑफच्या पहिल्या रात्री जरी कमी पडले, तरी अंतिम फेरीत पोहोचण्याची त्यांना आणखी एक संधी मिळेल हे जाणून दोन्ही संघ दबावाविना पूर्ण ताकद पणाला लावतील. 2014 नंतर पहिल्यांदाच पंजाब किंग्सला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळाले आहे. दुसरीकडे, आरसीबी बाद फेरीतील ह्रदयभंगाशी खूप परिचित आहे आणि प्रत्येक हंगामाप्रमाणे यावेळीही ते त्यांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची आशा बाळगून आहेत.
अय्यर-मुख्य प्रशिक्षक पाँटिंग जोडीमुळे पंजाब किंग्सला उत्तम वळण मिळाले आहे. त्यांनी दशकाहून अधिक काळ खराब कामगिरी केल्यानंतर अखेर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. या जोडीने खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेत त्यांना एक चांगले संघ बनवले आहे. प्रभसिमरन सिंग आणि नवोदित प्रियांश आर्य यांच्या सलामी जोडीने अय्यर आणि जोश इंग्लिससारख्या खेळाडूंना चांगला पाया घालून दिलेला आहे. फिनिशर शशांक सिंग प्रत्येक हंगामात आपला खेळ सुधारत गेला आहे आणि ऑस्ट्रेलियन मार्कस स्टोइनिसलाही अलीकडेच सूर गवसल्याने त्यांची फलंदाजी अधिक ताकवादन दिसते.
गोलंदाजी विभागात मात्र चिंता आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा मार्को जॅनसेन राष्ट्रीय संघात सामील होण्यासाठी मायदेशी परतला आहे. आज रात्री संघाला त्याची उणीव नक्कीच जाणवेल. संघासाठी पदार्पणात काइल जेमिसनने आशादायक कामगिरी केली आहे, परंतु प्रभाव पाडण्यासाठी त्याला सुऊवातीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अष्टपैलू अझमतुल्लाह उमरझाई जॅनसेनची जागा घेऊ शकतो. बोटाच्या दुखापतीमुळे गेल्या दोन सामन्यांमध्ये खेळू न शकलेला लेगस्पिनर युजवेंद्र चहल या सामन्यात परतण्याची आणि नेहमीच अचूक राहिलेल्या हरप्रीत ब्रारसोबत गोलंदाजी करण्याची अपेक्षा आहे. अर्शदीप सिंग हा त्यांचा बऱ्याच काळापासून उत्कृष्ट वेगवान गोलंदाज राहिलेला असून त्याने खेळाच्या सर्व टप्प्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
आरसीबीलाही दुखापतीची चिंता होती, परंतु ती बऱ्यापैकी दूर झाली आहे. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पूर्ण तंदुऊस्त होण्याची अपेक्षा आहे आणि टिम डेव्हिड देखील निवडीसाठी उपलब्ध असेल. संघाच्या दृष्टिकोनातून फिल सॉल्टने पॉवरप्लेमध्ये त्याच्या विध्वंसक फॉर्ममध्ये राहणे आणि विराट कोहलीने या हंगामात जशी फलंदाजी केली आहे तशी पुन्हा एकदा करणे अत्यंत आवश्यक आहे.
संघ : पंजाब किंग्स-श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वधेरा, हरनूर सिंग, मुशीर खान, पायला अविनाश, प्रभसिमरन सिंग, विष्णू विनोद, जोश इंग्लिस, मार्कस स्टोइनिस, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, अझमतुल्लाह उमरझाई, एरोन हार्डी, हरप्रीत ब्रार, सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, झेवियर बार्टलेट, कुलदीप सेन, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर, मिशेल ओवन, काइल जेमिसन.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर-रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, स्वस्तिक चिकारा, जितेश शर्मा, फिलिप सॉल्ट, मनोज भंडागे, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, नुवान तुषारा, यश दयाल, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, मोहित राठी, अभिनंदन सिंग, मयंक अग्रवाल, ब्लेसिंग मुझाराबानी, टिम सेफर्ट.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.