For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वच पक्षांच्या अग्निपरीक्षेचा प्रथम टप्पा

06:22 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्वच पक्षांच्या अग्निपरीक्षेचा प्रथम टप्पा
Advertisement

आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला 19 एप्रिल 2024, अर्थात येत्या शुक्रवारी प्रारंभ होत आहे. सर्वच पक्षांची अग्निपरीक्षा आता अधिक दूर नाही. या टप्प्यात एकंदर 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 102 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. मतदारसंघांच्या दृष्टीने हा या निवडणुकीतील 7 टप्प्यांमध्ये सर्वात मोठा टप्पा असून इतर कोणत्याही टप्प्यात या टप्प्याइतके मतदारसंघ नाहीत. तसेच इतकी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशही इतर कोणत्याही टप्प्यांमध्ये नाहीत. एंकदर, या टप्प्यातील मतदानातून साऱ्या देशाचाच कल कोणीकडे आहे, त्याचे अनुमान काढता येणार आहे. अर्थातच, हा कल सर्वसामान्य मतदारांना समजणार नाही. कारण, मतदानपूर्व सर्वेक्षणे तसेच मतदानोत्तर सर्वेक्षणे किंवा ओपिनियन पोल आणि एक्झ्टि पोल या टप्प्याच्या 48 तास आधी बंद केले जातील. त्यानंतर 1 जूनलाच मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर सायंकाळी साडेसात नंतर एक्झिट पोल दाखविण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने अनुमती दिली आहे. तथापि, राजकीय पक्षांकडे सर्वेक्षणे करण्याच्या स्वत:च्या यंत्रणा असतात. त्यांच्या माध्यमातून या टप्प्याची परिस्थिती अशी आहे आणि आपल्या पक्षाला किती संधी आहे, याची कल्पना त्यांना येऊ शकेल. त्यानुसार त्यांना इतर टप्प्यांसंबंधी प्रचार धोरण निधारीत करता येऊ शकेल. त्यामुळे हा टप्पा या निवडणुकीतील सर्वात महत्वाचा आहे, हे निश्चित. तेव्हा या कलदर्शक टप्प्याचा आढावा घेण्यास या पृष्ठापासून प्रारंभ करुया. त्यासमवेतच इतरही काही उद्बोधक आणि मनोरंजक सदरे आपल्या माहितीसाठी देण्यात आलेली आहेतच...

Advertisement

आव्हाने-प्रतिआव्हाने

भारतीय जनता पक्ष आणि रालोआ 

Advertisement

? भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, या प्रथम टप्प्यातील 50 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. स्वत: भारतीय जनता पक्षाने 41 जागा जिंकल्या होत्या. राजस्थानमधील 12 जागा. उत्तराखंडमधील सर्व 5 जागा, उत्तर प्रदेशात 3, मध्यप्रदेशात 4, महाराष्ट्रात 3, आसाममध्ये 4, बिहारमध्ये 2, पश्चिम बंगालमधील सर्व 3, अरुणाचल प्रदेशात सर्व 2 आणि इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून 3 अशा 41 जागांवर विजयी झालेला हा पक्ष या टप्प्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. त्या खालोखाल जागा द्रमुकला मिळाल्या होत्या.

? राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील इतर पक्ष, अर्थात अण्णाद्रमुक, एकसंध शिवसेना, संयुक्त जनता दल, ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्ष इत्यादी पक्षांना 9 जागांवर यश प्राप्त झाले होते. म्हणजेच, या टप्प्याने गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधी पक्ष यांच्यात समतोल साधलेला दिसून येतो. खरे तर विरोधी पक्षांना 2 जागा अधिक मिळालेल्या दिसून येतात. मात्र, याचे कारण तामिळनाडू हे राज्य आहे. या राज्यात विरोधी पक्षांना 39 पैकी  तब्बल 38 जागा मिळाल्या होत्या. रालोआला केवळ 1 जागा होती. या राज्यात भारतीय जनता पक्षाला एकही जागा न मिळाल्याचे दिसून येत आहे.

तामिळनाडूसाठी भाजपचे प्रयत्न

? या टप्प्यात देशाच्या पूर्व, ईशान्य. पश्चिम, उत्तर, मध्य, दक्षिण अशा सर्व भागांमधील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदारसंघांचा समावेश असल्याने देशाचा एकंदर कल याच टप्प्यात मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे. मागच्या निवडणुकीत या टप्प्यात सर्वात मोठा ठरलेला भारतीय जनता पक्ष यावेळी कशी कामगिरी करतो, यावर त्या पक्षाची स्थिती अवलंबून राहणार आहे. यंदा या पक्षाने तामिळनाडू या राज्यात जोर लावला आहे. त्याची सज्जता दोन वर्षांपासूनच करण्यात येत होती. तामिळनाडूतील ऐतिहासिक सँगोल हा राजदंड, जो वस्तुसंग्रहालयात होता, त्याला लोकसभेच्या नव्या वास्तूत मानाचे स्थान देण्यात आले आहे.

? याशिवाय, तामिळनाडूतील सर्व प्रमुख जातींमधील धर्माचार्यांचा सत्कार ‘उत्तर-दक्षिण संगम’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आला होता. दक्षिण आणि उत्तर भारताची धार्मिक आणि सामाजिक संस्कृती समानच आहे. दोन्ही प्रदेश एकमेकांशी घट्ट अशा परंपरेच्या बंधनाने जोडले गेले आहेत, हे ठळकपणे दर्शविणे हाच या उपक्रमांचा हेतू होता. तो किती साध्य झाला, हे या निवडणुकीच्या मतगणनेनंतरच 4 जून 2014 या दिवशी समजणार आहे.

द्रविडी राजकारणाला प्रत्युत्तर

? स्वातंत्र्याच्याही पूर्वीपासून तामिळनाडूतील द्रविडी राजकारण हे उत्तर भारत, उत्तर भारतीय आणि हिंदी भाषा यांच्या विरोधावर आधारलेले आहे. हिंदू धर्म किंवा सनातन धर्म हा तामिळी लोकांचा धर्म नसून तो उत्तर भारतीयांचा वर्चस्ववाद आहे, अशी विचारसरणी तामिळ जनतेच्या मनावर कित्येक दशकांपासून ठसविण्यात द्रविडी पक्ष प्रयत्नशील आहेत. तथापि, आता भारतीय जनता पक्षाने तामिळनाडूत आपले हातपाय एक वेगळी विचारसरणी घेऊन पसरविण्याचा प्रयत्न चालविला आहे. द्रविडी राजकारणामुळे दक्षिण भारत आणि उत्तर भारत अशी फूट पडली असून ती दोन्ही भागांच्या हिताची नाही, असे या पक्षाचे म्हणणे आहे.

? गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाने तामिळनाडूच्या जनतेचा विश्वास प्राप्त करण्याच्या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. तामिळनाडूच्या द्रविडी राजकारणाचा सनातन धर्माला जरी मोठा विरोध असला, तरी तेथील जनता सनातन धर्माचेच पालन करते. तेथील बहुतेक सर्वसामान्य नागरीक भाविक आणि देवभिरु आहेत, असे अनेक तज्ञांचे मत आहे. तामिळनाडूत हजारो मंदिरे आहेत. ती सनातन धर्म मानतो, त्या देवदेवतांचीच आहेत. ती नेहमी भक्तांनी भरलेली असतात. याच राज्यात कांची-कामकोटी येथे हिंदू धर्माचे आद्य संजीवक शंकराचार्यांच्या परंपरेतील मठ आहे. तो देशातील अन्य चार मठांच्या तोडीचा मानला जातो. भारतीय जनता पक्ष या आणि अशा समानतांच्या माध्यमातून या राज्यात आपली पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न करीत असताना दिसत आहे.

अन्य आव्हाने

या टप्प्यात मागच्या पेक्षा अधिक चांगली कामगिरी करायची असेल तर तामिळनाडूवर भर देण्यासमवेतच, अन्य राज्यांमध्येही आपल्या पूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती भारतीय जनता पक्षाला करावी लागणार आहे. उत्तर प्रदेशातही जागा अधिक मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागणार आहेत. उत्तर प्रदेशातील 8 जागांवर या टप्प्यात निवडणूक होत आहे. त्यांच्यापैकी गेल्या निवडणुकीत या पक्षाला कैराणा, मुझफ्फरपूर आणि पिलिभीत या तीनच जागा या पक्षाला जिंकता आल्या होत्या. गेल्यावेळी गमावलेल्या पाच जागांपैकी किमान चार जागा पुन्हा मिळविण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे. एकंदरीत पाहता, 102 पैकी किमान 60 जागांवर भारतीय जनता पक्ष आणि रालोआला यश मिळावे अशी योजना आहे.

विरोधकांचे प्रत्युत्तर कसे आहे ?

? विरोधी आघाडीनेही जोरदार प्रयत्न चालविले आहेत. या आघाडीसमोर भारतीय जनता पक्ष आणि रालोआच्या बरोबर उलट आव्हाने आहेत. आघाडीला तामिळनाडूतील आपली जवळपास 100 टक्के यशाची कामगिरी पुन्हा करुन दाखविण्याचे आव्हान आहे. त्याचबरोबर अन्य राज्यांमध्येही भारतीय जनता पक्षाला मागे टाकण्यासाठी नियोजन केले जात आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

? तामिळनाडूत भारतीय जनता पक्षाला पाय रोवण्याइतकी जागाही न देणे, हे द्रमुकसमोरचे आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या 41 जागांखालोखाल 30 जागांवर हा पक्ष विजयी झाला होता. यावेळीही याची पुनरावृत्ती करणे हे त्या पक्षासाठी आवश्यक आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून सनातन धर्माची छेड काढण्याची योजना करण्यात आली होती. सनातन धर्मासंबंधात अश्लाघ्य बोलून, तसेच हिंदी भाषा आणि उत्तर भारत यांच्या विरोधात आगपाखड करुन मतदारांमध्ये ‘द्रविडी’ भावना जागवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

काँग्रेससाठी राजस्थान, मध्यप्रदेश महत्वाचे

? गेल्या निवडणुकीत काँग्रेसला या पहिल्या टप्प्यातील जागांपैकी केवळ 12 जागा जिंकता आल्या होत्या. त्या 20 पर्यंत नेण्याचे आव्हान या पक्षासमोर आहे. त्यासाठी राजस्थान आणि मध्यप्रदेशात कामगिरी सुधारण्याचे आव्हान आहे. शिवाय तामिळनाडूतील गेल्यावेळी जिंकलेल्या सर्व आठ जागा पुन्हा राखायच्या आहेत. गेल्यावेळी तामिळनाडूत काँग्रेसने जिंकलेल्या आठ पैकी 3 जागा यावेळी तिचाच मित्रपक्ष असलेल्या द्रमुक पक्षाने स्वत:कडे घेतलेल्या असून काँग्रेसला वेगळ्या तीन जागा दिल्या आहेत. या जागा काँग्रेसने पूर्वी फारशा लढविलेल्या नाहीत. त्यामुळे या जागांवर कामगिरी कशी होते यावर तामिळनाडूत तो पक्ष गेल्यावेळेप्रमाणे सर्व आठ जागा जिंकू शकणार की नाही, हे ठरणार, असे तज्ञांचे मत आहे.

Advertisement
Tags :

.