पहिली न्युक्लियर डायमंड बॅटरी तयार
कुठल्याही उपकरणाला हजारो वर्षे करणार चार्ज
जगाची पहिली न्युक्लियर-डायमंड बॅटरी निर्माण झाली आहे. ही बॅटरी कुठल्याही प्रकारच्या छोट्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना हजारो वर्षांपर्यंत ऊर्जा प्रदान करू शकते. या बॅटरीत हिऱ्यामध्ये रेडिओअॅक्टिव्ह पदार्थ टाकण्यात आला आहे. या बॅटरीत कार्बन-14 नावाचा किरणोत्सर्गी पदार्थ असून त्याची हाफ लाइफ 5,730 वर्षे आहे, म्हणजेच उपकरण जर इतके वर्षे चालू शकत असेल तर त्याला ऊर्जा मिळत राहणार आहे.
इंग्लंडच्या ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी जगातील पहिली न्युक्लियर डायमंड बॅटरी तयार केली आहे. किरणोत्सर्गी पदार्थ आणि हिऱ्याद्वारे वीज निर्माण केली जाते, अशी माहिती वैज्ञानिकांनी दिली आहे. या बॅटरीच्या वापरासाठी कुठल्याही प्रकारच्या मोशनची गरज नाही, म्हणजे कॉइलच्या आत मॅग्नेट फिरविण्याची गरज नाही.
ही बॅटरी कुठल्याही पारंपरिक बॅटरी किंवा वीज निर्माण करणाऱ्या यंत्रापेक्षा अनेक पट कार्यक्षम आहे.या बॅटरीच्या आत रेडिएशनमुळे इलेट्रॉन्स वेगाने फिरतात, ज्यामुळे वीज निर्माण होते, सोलर पॉवरसाठी फोटोवोल्टिक सेल्सच्या ज्याप्रकारे वापर होतो, तसाच प्रकार या बॅटरीत घडतो. यात फोटोन्सना वीजेत रुपांतरित केले जाते.
2017 मध्ये प्रोटोटाइप बॅटरी
या वैज्ञानिकांनी यापूर्वी निकेल-63 च्या वापराद्वारे 2017 मध्ये प्रोटोटाइप बॅटरी तयार केली होती. परंतु नव्या बॅटरीला कार्बन-14 रेडिओअॅक्टिव्ह आइसोटोप आणि हिऱ्यासोबत तयार करण्यात आले आहे. या रेडिओअॅक्टिव्ह पदार्थाला हिऱ्याच्या मध्ये ठेवण्यात आले आहे. यामुळे वीज निर्माण होऊ लागते.
रेडिएशन रोखण्यासाठी हिऱ्याचा वापर
कार्बन-14 चा वापर हा रेडिएशन कमी आणि कमी अंतरापर्यंत रहावे म्हणून करण्यात आला आहे. हे सहजपणे कुठल्याही घनपदार्थात शोषून घेतले जाते. यामुळे रेडिएशनचा धोका कमी होतो. नुकसान कमी होते. कार्बन-14 ला थेट मोकळ्या हातांनी स्पर्श करता येत नाही, तसेच तो तोंडातही जाता कामा नये, अन्यथा हे जीवघेणे ठरू शकते.
हिरा हा जगातील सर्वात ठोस पदार्थ आहे. हिऱ्याहून अधिक सुरक्षित या बॅटरीसाठी काहीच नव्हते. कार्बन-14 नैसर्गिक पद्धतीने तयार होते, यामुळे याचा वापर आण्विक प्रकल्पाला नियंत्रित करण्यासाठी देखील केला जातो, अशी माहिती ब्रिस्टल विद्यापीठाचे वैज्ञानिक नील पॉक्स यांनी दिली आहे.
आण्विक बॅटरीची क्षमता
एक साधारण अल्कालाइन एए बॅटरी 20 ग्रॅमची असते, याच्या आत प्रत्येक एक ग्रॅम वजनात 700 ज्यूल्स एनर्जी स्टोरी असते, परंतु न्युक्लियर-डायमंड बॅटरीचा प्रत्येक ग्रॅम दरदिनी 15 ज्यूल्सची वीज देऊ शकतो. अशा स्थितीत हे कमी वाटत असले तरीही एए बॅटरीचा पूर्ण वापर झाल्यास ती एकाच दिवसात संपते, डायमंड बॅटरीसोबत हे घडत नाही. कार्बन-14 ची हाफ लाइफ 5,730 वर्षे आहे, म्हणजेच इतक्या वर्षांमध्ये हे केवळ स्वत:ची निम्मी शक्ती गमावणार आहे. भविष्यात या पदार्थांच्या शक्तीद्वारे अंतराळयान निर्माण करण्यात आल्यास ते आमच्या सौरमंडळातील सर्वात नजीकचा शेजारी अल्फा सेंटौरीपर्यंत पोहोचू शकेल. जे पृथ्वीपासून 4.4 प्रकाशवर्षाच्या अंतरावर आहे.