प्रथम पाईपलाईन घाला, त्यानंतरच रस्ता करा
मनपा-एलअँडटीच्या अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : शहरामध्ये प्रथम रस्ता केला जातो. त्यानंतर पाण्याच्या पाईपलाईन घातल्या जातात. त्यामुळे रस्ते खराब होत आहेत. याबाबत जनतेतूनही तक्रारी होत आहेत. तेव्हा प्रथम पाईपलाईन घालून त्यानंतर रस्ता करावा, अशी सूचना महानगरपालिकेच्या व एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. गुरुवारी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये या सूचना करण्यात आल्या. एल अँड टी कंपनीबाबत नेहमीच तक्रारी वाढल्या आहेत. 2019 पासून काम केले जाते. मात्र, ते काम त्यांच्याकडून पूर्ण होत नाही. महत्त्वाचे म्हणजे रस्ता केला जातो. त्यानंतर पाईप घालण्यासाठी खोदाई केली जाते, हे योग्य नाही, असे नगरसेवकांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. कोणत्याही परिस्थितीत यापुढे ज्या परिसरात पाण्याची समस्या आहे, त्या ठिकाणी प्रथम पाईपलाईनच घाला. त्यानंतर तेथील रस्ता करा, असे त्यांनी सांगितले.
खासबाग येथे शेकडो टन कचरा पडून आहे. त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा मागवण्यात आली. मात्र, त्याला कोणीच प्रतिसाद दिला नाही, असे पर्यावरण विभागाचे अभियंते हणमंत कलादगी यांनी सांगितले. हेस्कॉमकडे महानगरपालिकेची 17 कोटी रुपये रक्कम अजूनही पडून आहे. ती मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांनी ती रक्कम तातडीने जमा करण्याबाबत हेस्कॉमकडे पाठपुरावा करा आणि ती रक्कम मिळविण्याची सूचना महापौर सविता कांबळे यांनी केली. सत्तेत काँग्रेस सरकार आल्यानंतर अनुदानामध्ये कपात केली आहे, असा आरोप नगरसेवक हणमंत कोंगाली यांनी केला. त्यावर लेखा विभागाचे कार्यकारी अधिकारी चंदरगी यांनी अनुदान कमी आल्याचे मान्य केले. यावर आमदार राजू सेठ यांनी सरकारकडे पाठपुरावा करून योग्य ती रक्कम मिळवून घेतली जाईल, असे सांगितले.