प्रथम हिंदूंचे रक्षण निश्चित करा
विदेश सचिवांनी बांगलादेशला सुनावले : धार्मिक स्थळांची सुरक्षा करा
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर वाढत्या हल्ल्यांदरम्यान पहिल्यांदाच विदेश सचिव विक्रम मिसरी हे चर्चेसाठी ढाका येथे सोमवारी पोहोचले आहेत. ढाका पोहोचताच मिसरी यांनी स्पष्ट स्वरपात सर्वप्रथम हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांचे रक्षण तसेच त्यांच्या धार्मिक स्थळांची सुरक्षा निश्चित करा असे बांगलादेशला सुनावले आहे. विदेश सचिवांनी बांगलादेशच्या विदेश विषयक सल्लागारासमोर भारताची भूमिका मांडली आहे. भारत सकारात्मक, रचनात्मक संबंध राखू इच्छित असल्याने बांगलादेशने देखील अशाचप्रकारचे वर्तन करण्याची गरज असल्याचे विदेश सचिवांनी बांगलादेशच्या विदेश सल्लागाराला उद्देशून म्हटले आहे.
बांगलादेश प्राधिकरणाच्या अंतरिम सरकारसोबत मिळून काम करण्याच्या भारताच्या इच्छेला आज (सोमवार) अधोरेखित केल्याचे मिसरी यांनी स्वत:च्या उच्चस्तरीय बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावादरम्यान विदेश सचिव मिसरी यांनी बांगलादेशचे विदेश सल्लागार मोहम्मद जशीमुद्दीन यांच्यासोबत बैठक घेतली आहे. ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेश सोडावा लागल्यावर भारताकडून झालेला हा पहिलाच उच्चस्तरीय दौरा आहे. बांगलादेशात हिंदूंसमेत अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांवरून भारत आणि बांगलादेशमधील वाढत्या तणावादरम्यान मिसरी यांचा हा दौरा होत आहे.
आम्ही अलिकडच्या घटनांवर चर्चा केली आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांची सुरक्षा तसेच कल्याणाशी संबंधित चिंतांची जाणीव करून दिली. आम्ही सांस्कृतिक आणि धार्मिक संपत्तींवरील हल्ल्यांच्या खेदजनक घटनांवरही चर्चा केली असल्याचे मिसरी यांनी सांगितले आहे.
मिसरी हे भारतीय वायुदलाच्या विमानाने ढाका येथे पोहोचले होते. बांगलादेशच्या विदेश मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने विमानतळावर त्यांचे स्वागत केले. भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा देखील विमानतळावर उपस्थित होते. ढाका येथे पोहोचल्यावर मिसरी यांनी जशीमुद्दीन यांच्यासोबत बैठक घेतली आहे.
जशीमुद्दीन आणि भारताचे विदेश सचिव विक्रम मिसरी यांच्यातील बैठक ही निर्धारित कार्यक्रमानुसार झाली आहे. प्रथम दोघांमध्ये आमने-सामने संक्षिप्त चर्चा झाली आणि मग दोन्ही देशांच्या शिष्टमंडळासोबत औपचारिक बैठक पार पडली असल्याचे बांगलादेशच्या विदेश मंत्रालयाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान मिसरी हे बांगलादेशचे काळजीवाहू विदेशमंत्री मोहम्मद तौहीद हुसैन यांनाही भेटणार आहेत. तसेच बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांची भेट घेण्याचाही कार्यक्रम आहे. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांवरून भारताच्या चिंता युनुस यांच्यासमोर मिसरी मांडणार असल्याचे मानले जात आहे.
चिन्मय दास यांच्या अटकेची पार्श्वभूमी
5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांना देश सोडावा लागल्यावर बांगलादेशात हिंदूधर्मीयांना लक्ष्य करण्याच्या घटना मोठ्या संख्येत घडत आहेत. काही दिवसांपूर्वी इस्कॉनशी निगडित चिन्म कृष्णदास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. याविरोधात तेथील हिंदूंनी निदर्शने केली होती. तर चिन्मय दास यांच्या अटकेप्रकरणी भारताने देखील चिंता व्यक्त केली होती.